१५ सप्टेंबरपासून होणाऱ्या आशियाई चषकासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची आज घोषणा केली. कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देत, बीसीसीआयने रोहित शर्माकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. शिखर धवनकडे या संघाचं उप-कर्णधारपद सोपवण्यात आलंय. या संघात राजस्थानच्या खलिल अहमदला जागा मिळाली आहे. खलिल अहमदच्या कारकिर्दीबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

  • जयपूरपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या टोंक गावात खलिल अहमदचा जन्म झाला.
  • खलिलचे वडील हे कपांऊंडर म्हणून काम करत होते, खलिलने क्रिकेटमध्ये आपली कारकिर्द घडवण्यासाठी त्यांचा विरोध होता. मात्र प्रशिक्षकांनी समजूत काढल्यानंतर खलिल क्रिकेट खेळायला लागला.
  • सुरुवातीच्या काळात खलिल टेनिस बॉलने सिमेंटच्या पिचवर सराव करायचा.
  • २०१६ साली झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकात खलिलची भारतीय संघात निवड झाली होती. इशान किशनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात खलिल खेळला होता. या स्पर्धेत खलिलने ६ सामन्यात ३ बळी मिळवले होते.
  • १९ वर्षाखालील भारतीय संघात खलिलला राहुल द्रविड यांचं मार्गदर्शन लाभलं आहे.
  • २०१७ साली टी-२० क्रिकेटमध्ये खलिलने राजस्थानकडून प्रथमश्रेणी सामन्यात पदार्पण केलं.
  • २०१८ च्या आयपीएल हंगामात सनराईजर्स हैदराबादने खलिलवर ३ कोटी रुपयांची बोली लावली होती.
  • भारतीय संघाचा माजी गोलंदाज झहीर खान हा आपला आदर्श असल्याचं खलिलने याआधीच मान्य केलं आहे.
  • मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत खलिलने तेज-तर्रार मारा केला होता. या स्पर्धेत खलिल १४८ च्या वेगाने गोलंदाजी करत होता.
  • नुकत्याच बंगळुरुत पार पडलेल्या चौरंगी मालिकेत खलिल सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर होता.