हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भारताने निर्धारित ५० षटकात ७ बाद २८५ धावा केल्या. सलामीवीर शिखर धवन याने आपल्या टोपणनावाला साजेशी ‘गब्बर’ खेळी केली. त्याने दमदार शतक ठोकले. १२० चेंडूत १२७ धावा करून तो तंबूत परतला. या खेळीत त्याने १५ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली. पण शतकी खेळी करूनही त्याला विराट कोहलीचा विक्रम मोडता आला नाही.

शिखर धवनचे हे १४ शतक ठरले. त्याला १४ शतके ठोकण्यास १०५ डाव लागले. मात्र विराट कोहलीने १०३ डावांत १४ शतके झळकावली होती. शिखर धवनने शतक झळकावून आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले. मात्र सर्वात जलद १४ शतके झळकवणारा भारतीय फलंदाज ठरण्याचे त्याचे स्वप्न भंगले. याशिवाय, सर्वात जलद १४ शतक झळकावणाऱ्या फलंदाजांमध्येही तो चौथा फलंदाज ठरला. या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा हशीम आमलाने ८४ डावांत १४ शतके झळकावली होती. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (९८) आणि भारताचा विराट कोहली (१०३) यांनी हा पराक्रम केला होता.

दरम्यान, भारताच्या डावात अंबाती रायडूनेही आपली निवड सार्थ ठरवत अर्धशतक झळकावले. हाँगकाँगकडून किंचित शाहने सर्वाधिक ३ बळी टिपले.