प्रदीर्घ कालावधीनंतर भारताच्या वन-डे संघात पदार्पण करणाऱ्या रविंद्र जाडेजाने पहिल्याच सामन्यात ४ बळी घेऊन आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. या कामगिरीसाठी जाडेजाला सामनावीराचा किताब देऊनही गौरवण्यात आलं. हा किताब स्विकारत असताना, रविंद्र जाडेजाने आपल्याला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य – सौरव गांगुली

“हे पुनरागमन माझ्या नेहमी लक्षात राहिलं, कारण जवळपास ४८० दिवसांनंतर मी भारतीय वन-डे संघात परतलो आहे. याआधीही मी संघाबाहेर राहिलो आहे मात्र त्यावेळी कालावधी हा छोटा होता. माझ्या ताकदीवर माझा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे कोणालाही मला सिद्ध करुन दाखवायची गरज वाटत नाही. माझी फलंदाजी-गोलंदाजी अजुन चांगली करण्याकडे माझा भर राहिलं.” सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जाडेजा बोलत होता.

पुनरागमनानंतर पहिल्याच सामन्यात धडाकेबाज कामगिरी करुन जाडेजाने निवड समितीला विश्वचषकासाठीच्या संघासाठी आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. विश्वचषकाबद्दल प्रश्न विचारला असता जाडेजा म्हणाला, “अजुन विश्वचषकाला अवधी आहे. त्याआधी भारतीय संघ अनेक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सामने खेळणार आहे. त्यामुळे ज्या ज्या सामन्यात मला चांगली संधी मिळेल तिकडे सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहिलं असंही जाडेजा म्हणाला.

अवश्य वाचा – ‘हिटमॅन’च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी