इराणच्या गोरगान शहरात पार पडलेल्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या दोनही संघांनी विजेतेपदाचा मान पटकावला. भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानला अंतिम फेरीत ३६-२२ अशी मात केली. तर भारतीय महिलांनी अंतिम फेरीत दक्षिण कोरियाचं आव्हान ४२-२० च्या फरकाने मोडून काढत विजेतेपदावर मोहोर उमटवली. या स्पर्धेत साखळी फेरीच्या सामन्यात भारताने इराक, जपान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा पराभव केला. याचसोबत अंतिम फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं आव्हान पुन्हा एकदा परतवून लावत विजेतेपद आपल्याकडे राखलं. मात्र इतकं यश मिळूनही भारताचा कर्णधार अजय ठाकूर मात्र काहीसा नाराज आहे.

अंतिम सामना जिंकल्यानंतर अजय ठाकूरने इन्स्टाग्रामच्या मदतीने भारतातील आपल्या चाहत्यांशी थेट संवाद साधला. यावेळी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या सामन्यांचं भारतात थेट प्रक्षेपण न झाल्याने अजयने नाराजी व्यक्त केली. “आम्हाला नुकतचं समजलं की या सामन्यांचं भारतात कोणत्याही वाहिनीवर थेट प्रक्षेपण करण्यात आलेलं नाहीये. माझ्यासाठी ही गोष्ट अतिशय निराशाजनक आहे. आपला संघ खेळताना पाहणं हे प्रत्येक पाठीराख्याचं स्वप्न असतं. पण भारतात हे सामने दाखवलेच गेले नसल्याने चाहत्यांची नाराजी मी समजू शकतो. मात्र मी भारतात परतल्यानंतर या स्पर्धेतील सामन्यांचे जास्तीतजास्त व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन.” अजयने इन्स्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली.

अवश्य वाचा – आशियाई अजिंक्यपद कबड्डी – इराणध्ये भारताचा दबदबा, अंतिम फेरीत भारताचे संघ विजयी

या व्हिडीओत अजय ठाकूरने आपल्या संघाचं कौतुक केलं. अनुप आणि राकेश कुमार यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवणं ही माझ्यासाठी मोठी बाब होती. पण माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मला चांगली साथ दिली. मणिंदर सिंह आणि प्रदीप नरवालच्या खेळीचं अजयने विशेष कौतुक केलं. इराणमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेच्या एकाही सामन्याचं भारतात थेट प्रक्षेपण करण्यात आलं नव्हतं. यामुळे सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी सामने थेट पाहता येत नसल्याने नाराजी व्यक्त केली. या स्पर्धेनंतर डिसेंबर महिन्यात भारताचे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.