इराणच्या गोरगान शहरात सुरु असलेल्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत सलामीच्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. अजय ठाकूरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने इराकचा ६१-२१ अशा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. पहिल्या सत्रापासून सामन्यावर पकड ठेवलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या सत्रात काही क्षुल्लक चुका केल्या, मात्र भारतीय खेळाडूंचा सामना करणं इराकच्या खेळाडूंना जमलं नाही. अजय ठाकूरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ यंदाच्या स्पर्धेत विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.

चढाई आणि बचावात वर्चस्व राखत पहिल्या सत्रात भारताने इराकचा सामन्यात डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. पहिल्या सत्राच्या अखेरीस भारताच्या संघाकडे ३०-३ अशी आघाडी होती. मात्र दुसऱ्या सत्रात भारताच्या खेळाडूंनी इराकला सामन्यात परतण्याची संधी दिली. इराकच्या चढाईपटूंना काही क्षुल्लक गुण भारतीय बचावपटूंनी बहाल केले. याचा फायदा उचलत २७ गुणांनी पिछाडीवर असलेल्या इराकच्या संघाने सामन्यात २१ गुणांपर्यंत मजल मारली. मात्र भारतीय संघाला पराभवाचा धक्का देणं त्यांना काही जमलं नाही.

दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने आपल्या पहिल्या सामन्यात जपानवर मात केली. सामन्यात एका क्षणाला जपानच्या खेळाडूंनी पाकिस्तानला चांगली लढत दिली, मात्र पाकिस्तानच्या खेळाडूंनी सामन्यावरील आपली पकड कायम ठेवत ५७-१९ असा विजय मिळवला.