जर्मनीच्या पाचव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हने एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत गटवार साखळीत अर्जेटिनाच्या आठव्या मानांकित दिएगो श्वार्ट्झमनवर विजय मिळवत उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवल्या.

झ्वेरेव्हने दुसरा सेट गमावूनही श्वार्ट्झमनवर ६-३, ४-६, ६-३ असा विजय मिळवला. या लढतीपूर्वी उभय खेळाडू चार वेळा आमने-सामने आले होते. त्यात दोघांनी प्रत्येकी दोन लढती जिंकल्याने या स्पर्धेतील लढत चुरशीची होणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे झ्वेरेव्हने पहिला सेट जिंकल्यावर दुसऱ्या सेटमध्ये श्वार्ट्झमनने दमदार पुनरागमन केले. मात्र पुन्हा तिसऱ्या सेटमध्ये झ्वेरेव्हने सरस खेळ केला. श्वार्ट्झमनला याआधी या स्पर्धेत सलामीच्या लढतीत अव्वल मानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचकडून हार स्वीकारावी लागली होती. सलग दोन पराभवांमुळे श्वार्ट्झमनचे आव्हान संपुष्टात आले आहे.

तत्पूर्वी, अन्य गटातील लढतीत ग्रीसच्या सहाव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासने रशियाच्या सातव्या मानांकित आंद्रेय रुब्लेववर ६-१, ४-६, ७-६ असा रंगतदार लढतीत विजय मिळवला. त्सित्सिपासने या विजयासह उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवल्या. स्पेनचा दुसरा मानांकित राफेल नदाल आणि त्सित्सिपास यांच्यातील विजेता उपांत्य फेरी गाठेल. या दोघांमध्ये महत्वपूर्ण लढत गुरुवारी होणार आहे.