अंतिम फेरीत न्यूझीलंडवर विजय, ट्वेन्टी-२० प्रकारामध्ये पुन्हा अव्वल स्थानी

ऑस्ट्रेलियाने तिरंगी ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिका जिंकली. पावसाने व्यत्यय आणलेल्या अंतिम लढतीमध्ये बुधवारी न्यूझीलंडवर त्यांनी १९ धावांनी विजय मिळवत जेतेपदासह अव्वल स्थानी झेप घेतली.

ईडन पार्कवर न्यूझीलंडच्या १५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने १४.४ षटकांत ३ बाद १२१ धावा केल्या असताना पावसामुळे खेळ थांबवावा लागला. पाऊस कायम राहिल्याने पुढे खेळ होऊ शकला नाही. त्या वेळी डकवर्थ-लुइस पद्धतीनुसार, ऑस्ट्रेलियासमोर १०३ धावांचे लक्ष्य होते. त्यामुळे १९ धावांनी विजय मिळवत त्यांनी जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

पाचवी ट्वेन्टी-२० लढत खेळणारा सलामीवीर डीअ‍ॅर्सी शॉर्टने कारकीर्दीतील दुसरे अर्धशतक ठोकताना ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने ३० चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावा फटकावल्या.

शॉर्टने केवळ वैयक्तिक खेळ उंचावला नाही तर कर्णधार डेव्हिड वॉर्नरसह संघाला ८ षटकांत ७२ धावांची झटपट भागीदारी करून दिली. या भागीदारीने ऑस्ट्रेलियाच्या डावाचा पाया रचला गेला. अर्धशतकी सलामीनंतर शॉर्ट आणि वॉर्नर सहा धावांच्या फरकाने बाद झाले. वॉर्नरने २३ चेंडूंत २ चौकारांसह २५ धावा केल्या. या जोडीनंतर ग्लेन मॅक्सवेल (नाबाद २० धावा) आणि आरोन फिंचने (नाबाद १८ धावा) ऑस्ट्रेलियाची धावगती कायम राखली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला २० षटकांत ९ बाद १५० धावांवर रोखण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. त्याचे श्रेय डावखुरा फिरकीपटू अ‍ॅस्टन अ‍ॅगरसह (३ बळी) आणि वेगवान दुकली केन रिचर्डसन आणि अँड्रय़ू टायला (प्रत्येकी २ बळी) यांना जाते. न्यूझीलंडतर्फे सर्वाधिक योगदान मधल्या फळीतील रॉस टेलरचे आहे. त्याने ३८ चेंडूंत ४३ धावा केल्या. त्यात २ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. ट्वेन्टी-२० तिरंगी जेतेपदासह ऑस्ट्रेलियाने आयसीसी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी घेतली. त्यांनी पाकिस्तानला मागे टाकले. आयसीसी ट्वेन्टी-२० क्रमवारीला सुरुवात झाल्यापासून ऑस्ट्रेलियाने प्रथमच पहिले स्थान मिळवले आहे.