News Flash

रोहित रॉकेट सुसाट!

बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवारी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली गेली आणि याचा महानायक होता मुंबईकर रोहित शर्मा तर खलनायक होता

| November 3, 2013 05:53 am

बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवारी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली गेली आणि याचा महानायक होता मुंबईकर रोहित शर्मा तर खलनायक होता ऑस्ट्रेलियाचा जेम्स फॉल्कनर. चिन्नास्वामीच्या नभांगणात फटाक्यांच्या आतषबाजीपेक्षाही रोहितच्या विक्रमी १६ षटकारांच्या फटाक्यांनी क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. समस्त भारतीयांना दिवाळीनिमित्त खास भेट देण्याच्या निमित्ताने रोहित शर्माने २०९ धावांची विक्रमी खेळी साकारली. त्यामुळे सातव्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने ५७ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-२ अशा फरकाने जिंकण्याचा पराक्रम साधला. ऑस्ट्रेलियाच्या डावात फॉल्कनरने शतकी खेळी साकारून भारताचा विजय लांबवला. परंतु मोहम्मद शामीच्या गोलंदाजीवर शिखर धवनने फॉल्कनरचा लाजवाब झेल टिपला आणि ऑस्ट्रेलियाच्या डावाला पूर्णविराम दिला.
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या (२१९) नावावर आहे. रोहितने शनिवारी या द्विशतकवीरांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर मजल मारताना सचिन तेंडुलकरला (२०० नाबाद) मागे टाकले. रोहितला सामनावीर आणि मालिकावीर अशा दोन्ही पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
रोहितने ‘दिन दिन दिवाळी’ साजरी करताना १५८ चेंडूंत १६ षटकार आणि १२ चौकारांसह २०९ धावांची खेळी साकारली, तेव्हा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची दीनवाणी अवस्था झाली होती. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शेन वॉटसनने नोंदवलेला सर्वाधिक १५ षटकारांचा विक्रम रोहितने मोडीत काढला.
रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या शनिवारी नोंदवली, याप्रमाणे पाहुण्या संघाविरुद्धही सर्वोच्च धावसंख्या भारताने नोंदवली. भारतीय फलंदाजांनी शेवटच्या पाच षटकांमध्ये अशक्यप्राय १०० धावा केल्या. रोहितने ११४ चेंडूंमध्ये आपले शतक साजरे केले, त्यानंतर फक्त ४२ चेंडूंमध्ये त्याने द्विशतक गाठले. रोहितने डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मिड-विकेट याच क्षेत्रात सर्व षटकारांची मनसोक्त उधळण केली.
रोहितला सलामीवीर साथीदार शिखर धवन (६०) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी सुरेख साथ दिली. धोनीने फक्त ३८ चेंडूंत धडाकेबाज ६२ धावा काढताना ७ चौकार आणि २ षटकार ठोकले. रोहित आणि धोनीने पाचव्या विकेटसाठी १५.४ षटकांत १०.६५च्या सरासरीने १६७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्याआधी रोहितने धवनसोबत ११२ धावांची सलामी नोंदवली. या जोडीने चालू मालिकेत तिसऱ्यांदा शतकी सलामी दिली. रोहितने चालू वर्षांत ५०पेक्षा अधिक सरासरी राखताना एक हजार धावांचा टप्पाही ओलांडला. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत जयपूरमध्ये १४१ धावांची सामना जिंकून देणारी खेळी साकारली होती. त्यानंतर नागपूरमध्ये ७९ धावा केल्या होत्या.
धावांची दिवाळी सुरू असताना विराट कोहली (०) मात्र अपयशी ठरला. याचप्रमाणे युवराज सिंग (१२) आणि सुरेश रैना (२८) यांना आपला पुरेसा प्रभाव दाखवता आला नाही.
ऑस्ट्रेलियाचे सर्वच आघाडीचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. क्लिंट मकायने १० षटकांत सर्वाधिक ८९ धावा दिल्या आणि एक बळी घेतला. याशिवाय नॅथन कल्टर-निले (१० षटकांत ८० धावा) आणि जेम्स फॉल्कनर (१० षटकांत ७५ धावांत १ बळी) यांची रोहित आणि धोनी यांनी यथेच्छ धुलाई केली.
ऑस्ट्रेलियाची ६ बाद १३८ अशी केविलवाणी अवस्था झाली असताना भारताने दणदणीत विजयाचे स्वप्न पाहिले. परंतु फॉल्कनरला ते नामंजूर होते. त्याने ७३ चेंडूंत ११ चौकार आणि ६ षटकारांसह ११६ धावांची खेळी साकारली. याचप्रमाणे ग्लेन मॅक्सवेलने २२ चेंडूंत ७ षटकारांसह ६० धावा केल्या.

‘‘मोठी धावसंख्या रचण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवत मी मैदानात उतरलो होतो. द्विशतकाचा आनंद काही वेगळाच आहे. येथील मैदान लहान व खेळपट्टी फलंदाजीला पोषक असल्यामुळे मुक्त फलंदाजी करण्याचे माझे ध्येय होते. सोप्या चेंडूंना सीमारेषेबाहेर करण्याचे माझे डावपेच यशस्वी ठरले. जयपूर येथील सामन्यात शतक केल्यानंतर माझा शतकाबाबत आत्मविश्वास उंचावला होता. तीच मालिका पुढे ठेवायचा माझा प्रयत्न होता आणि त्यामध्ये मी यशस्वी झालो.’’
रोहित शर्मा

धावफलक
भारत : रोहित शर्मा झे. बदली (हेन्रिक्स) गो. मकाय २०९, शिखर धवन पायचीत गो. डोहर्टी ६०, विराट कोहली धावचीत ०, सुरेश रैना पायचीत गो. डोहर्टी २८, युवराज सिंग झे. हॅडिन गो. फॉल्कनर १२, महेंद्रसिंग धोनी धावचीत ६२, रवींद्र जडेजा नाबाद ०, अवांतर १२, एकूण ५० षटकांत ६ बाद ३८३
बाद क्रम : १-११२, २-११३, ३-१८५, ४-२०७, ५-३७४, ६-३८३
गोलंदाजी : क्लिंट मकाय १०-०-८९-१, नॅथन कल्टर-निले १०-०-८०-०, जेम्स फॉल्कनर १०-०-७५-१, शेन वॉटसन ५-०-२६-०, झेव्हियर डोहर्टी १०-०-७४-२, ग्लेन मॅक्सवेल ४-०-३२-०, आरोन फिन्च १-०-२-०
ऑस्ट्रेलिया : आरोन फिन्च पायचीत गो. शामी ५, फिलिप ह्य़ुजेस झे.युवराज गो. अश्विन २३, ब्रॅड हॅडिन त्रिफळा गो.अश्विन ४०, जॉर्ज बेली धावचीत ४, अ‍ॅडम व्होग्ज त्रि.गो.शमी ४, ग्लेन मॅक्सवेल झे.जडेजा गो. विनय कुमार ६०, जेम्स फॉल्कनर झे.धवन गो.शामी ११६, शेन वॉटसन झे. शामी गो. जडेजा ४९, नाथन कल्टर-निले झे. कोहली गो. जडेजा ३, क्लिंट मकाय त्रिफळा गो. जडेजा १८, झेव्हियर डोहर्टी नाबाद ०, अवांतर ४, एकूण ४५.१ षटकांत सर्व बाद ३२६.
बाद क्रम : १-७, २-६४, ३-७०, ४-७४, ५-१३२, ६-१३८, ७-२०५, ८-२११, ९-३२६, १०-३२६.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ८-१-४७-०,  महम्मद शामी  ८.१-०-५२-३, आर. विनय कुमार ९-०-१०२-१, आर. अश्विन  १०-०-५१-२, रवींद्र जडेजा १०-०-७३-३.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2013 5:53 am

Web Title: australia goes down fighting as india clinch series 3 2
टॅग : Australia
Next Stories
1 चौसष्ट घरांचा सम्राट कोण होणार ?
2 आयसीसी पुरस्काराच्या शर्यतीत धोनी, कोहली
3 अनिर्णीत सामन्यात गेलचा गोलंदाजांना धोक्याचा इशारा
Just Now!
X