ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवारी पर्थमध्ये सुरू होणार आहे. कसोटी विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने हा सामना दोनही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. पण नवलाची गोष्ट म्हणजे या सामन्यात पंचांना विक्रम करण्याची संधी आहे. पाकिस्तानचे लोकप्रिय अंपायर अलीम दार यांच्यासाठी हा सामना अत्यंत खास असणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हा अंपायर म्हणून अलीम दार यांचा १२९ कसोटी सामना असणार आहे. मैदानावरील पंच म्हणून ते या सामन्यात काम पाहणार आहेत. या सामन्यासोबत दार हे सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहण्याचा विक्रम मोडू शकतात.

पंच अलीम दर

 

सध्या हा विक्रम स्टीव्ह बकनर यांच्या नावावर आहे. मात्र ५१ वर्षीय अलीम दार यांना हा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे. काही वर्षे अलीम दार हे पाकिस्तानकडून क्रिकेट खेळले, पण अल्पावधीतच त्यांनी पंच म्हणून कारकिर्द करण्याचा निर्णय घेतला. २००३ साली त्यांनी ढाका येथील सामन्यातून पदार्पण केले.

२००० साली पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका या एकदिवसीय सामन्याच्या माध्यमातून दार यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरूवात केली. दार यांनी २०७ एकदिवसीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले. दक्षिण आफ्रिकेच्या रुडी कर्टझन यांनी या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक २०९ सामन्यांत पंच म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा विक्रम मोडण्यापासूनही ते फक्त दोन सामने दूर आहेत. दार यांनी ४६ आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले.