भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

आखूड टप्प्याच्या चेंडूंची मी कधीच फारशी चिंता बाळगत नाही. मी आयुष्यात त्यांना अनेकदा सामोरा गेलो आहे, असे विधान करीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने भारतीय गोलंदाजांना आव्हान दिले आहे.

‘‘भारतीय संघ आखूड टप्प्याचे चेंडू टाकून मला बाद करण्यासाठी प्रयत्नशील राहिल्यास त्याचा मोठा फायदा ऑस्ट्रेलिया संघाला होईल. मी माझ्या क्रिकेट कारकीर्दीत अनेक आखूड टप्प्याच्या चेंडूंचा सामना केला आहे. मी चेंडू पाहून त्याला कसा टोलवायचा, हा निर्णय घेतो; परंतु त्याची चिंता बाळगत बसत नाही,’’ असे मत स्मिथने व्यक्त केले.

२०१९-२०च्या क्रिकेट हंगामात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत डावखुरा वेगवान गोलंदाज नील व्ॉगनरने चार वेळा स्मिथला बाद करण्याची किमया साधली होती. स्मिथविरोधात वॅगनरने सातत्याने आखूड टप्प्याचे शरीरवेधी चेंडू टाकले होते. स्मिथने तरीही मधल्या फळीत समर्थपणे किल्ला लढवताना तीन सामन्यांमध्ये ४३ अशी धावसरासरी राखली होती. ‘‘वॅगनरने मला बाद करण्यासाठी केलेल्या योजना यशस्वी ठरल्या; परंतु त्यानंतर अनेक प्रतिस्पध्र्याना वॅगनरप्रमाणे योजना आखून मला बाद करण्यात अपयश आले,’’ असे स्मिथने सांगितले.

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय, तीन ट्वेन्टी-२० आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिका अनुक्रमे सिडनी आणि कॅनबेरा येथे २७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. या मालिकेतील प्रकाशझोतामधील सामना १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा जसप्रित बुमरा आणि मोहम्मद शमी यांच्यावर असेल. अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा अद्याप ‘आयपीएल’मध्ये झालेल्या दुखापतीतून सावरलेला नाही. उमेश यादव आणि नवदीप सैनी यांचाही वेगवान माऱ्यात समावेश आहे.

भारताच्या याआधीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्मिथ खेळला नव्हता, कारण चेंडू फेरफार प्रकरणी त्याच्यावर ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ मंडळाकडून एक वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

पुकोवस्कीची समाजमाध्यमांपासून दूर

ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख क्रिकेटपटू विल पुकोवस्कीने समाजमाध्यमांपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पुकोवस्कीला ऑस्ट्रेलियाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये निवडीसंदर्भात सध्या समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा रंगते आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे त्याने स्पष्ट केले. ‘‘मी सध्या तरी माझ्या तयारीकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. कारण तेच माझ्या हातात आहे. समाजमाध्यमांवर काट मारल्यावर बाकी कार्य करणे सोपे जाते,’’ असे पुकोवस्कीने सांगितले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी साहा तंदुरुस्त -गांगुली

नवी दिल्ली : भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी तंदुरुस्त होईल, असा निर्वाळा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने दिला आहे. ‘‘साहाची मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नाही तर कसोटी संघासाठी निवड झाली आहे. सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० लढती होणार आहेत. त्यानंतर कसोटी मालिकेला सुरुवात होईल. मांडीच्या स्नायूच्या दुखापतीतून तोपर्यंत साहा बरा होईल,’’ असे गांगुलीने स्पष्ट केले. तो पुढे म्हणाला की, ‘‘रोहित शर्मालादेखील मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यास काही दिवस लागणार असल्याने त्याची फक्त कसोटी संघात निवड झाली आहे.’’