भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच झालेली कसोटी मालिका मैदानावरच्या खेळापेक्षा दोन्ही संघातील आजी-माजी खेळाडू, प्रसारमाध्यमांमधील वाकयुद्धामुळे प्रचंड गाजली. या मालिकेदरम्यान दोन्ही संघाच्या खेळाडुंमध्ये प्रचंड तणाव निर्माणही झाला होता. मात्र, आता ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ या न्यायाने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने या वादाला तिलांजली दिल्याचे दिसते. स्टिव्ह स्मिथ यंदा आयपीएलध्ये पुण्याच्या संघाकडून खेळत आहे. याच पार्श्वभूमीवर स्मिथने नुकतेच अजिंक्य रहाणेसोबत हटके फोटोशुट केले. या फोटोशुटसाठी स्मिथने पारंपरिक पुणेरी पगडी घातलेला पोशाख परिधान केला आहे. या पोशाखात गोरागोमटा स्मिथ अस्सल पुणेकरासारखा शोभून दिसत आहे. त्यामुळे आता मैदानात स्मिथच्या अंगभूत ऑस्ट्रेलियन खडूसपणाला पुणेरी टच मिळणार, यात शंका नाही. विशेष म्हणजे या छायाचित्रात त्याच्यासोबत भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे ‘सादर करीत आहोत, स्टिव्ह स्मिथचे पुणेरी व्हर्जन’ अशा थाटात पोझ देऊन उभा आहे. स्मिथने त्याच्या इन्स्टाग्रामवर हे छायाचित्र पोस्ट केले आहे. एकुणच या छायाचित्रातील स्मिथ आणि रहाणे यांच्यातील मोकळेपणा क्रिकेटमधील खिलाडूवृत्तीला साजेसा आहे.

येत्या ५ एप्रिलपासून आयपीएल स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या संपूर्ण स्पर्धेत आपल्याला भारतीय खेळाडुंबरोबर खेळावे लागणार आहे, याची स्मिथला चांगली जाणीव आहे. त्यामुळेच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील धरमशाला येथील अखेरचा कसोटी सामना संपल्यानंतर स्मिथने अजिंक्य रहाणेसह पूर्ण भारतीय संघाला बीअर पिण्यासाठी निमंत्रण दिले होते. सामना किंवा मालिका संपली की प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंसोबत बीअर पिण्याचे निमंत्रण देणे ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीत आहे. मालिका गमावल्यानंतर पत्रकार परिषदेत स्मिथने मुरली विजय विरुद्ध निघालेल्या अपशब्दांवरून आपला माफीनामा देखील सादर केला होता. मात्र, भारताचा कर्णधार विराट कोहली याने पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसोबत पूर्वीसारखे संबंध राहिलेले नाहीत. आता परिस्थिती नक्कीच बदलली आहे. पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंबद्दलचे मत आता खोटे ठरले आहे. ते आता माझे मित्र राहिलेले नाहीत, असे जाहीर विधान केले होते.

https://www.instagram.com/p/BSbJiTTDFjj/