आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रिकेटसाठी केलेल्या नियमांचे उल्लंघन करून आस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी चाहत्यांचा विश्वास गमावला आहे, असे दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सने सांगितले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात चेंडूचा फेरफार केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट यांच्यावर आयसीसीने कारवाई केली आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना स्टारपिक स्पोर्ट्स गेमिंगचा सल्लागार ऱ्होड्स म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी केलेल्या या कृत्याबाबत जगभरातील क्रिकेटप्रेमींकडून टीका होत आहे. ऑस्ट्रेलियातील क्रिकेट मंडळ, सरकार आणि नागरिक यांच्याकडूनही चेंडूच्या फेरफार प्रकरणाची निर्भर्त्सना केली जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंचे मैदानावरील वागणे हे भिडस्त असल्यामुळे आता सर्वाना त्यांच्यावर तोंडसुख घेण्याची ही नामी संधी चालून आली आहे. त्यामुळे मी आणखी काय भाष्य करणार?’’

तो पुढे म्हणाला, ‘‘आयसीसीच्या नियमांची बांधिलकी जपणे अतिशय महत्त्वाचे असते. कॅगिसो रबाडावर आयसीसीने कारवाई करताना दोन सामन्यांची बंदी घातली होती. परंतु त्याने त्या निर्णयाविरोधात दाद मागितली. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये रबाडाने नियमाविरुद्ध कोणतेही कृत्य केले नसल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्याच्यावरील शिक्षा रद्द करण्यात आली.’’

खो-खो खेळा, क्षेत्ररक्षण सुधारा!

खो-खो खेळा आणि क्षेत्ररक्षण सुधारा, असा मूलमंत्र यावेळी ऱ्होड्सने दिला. तो म्हणाला, ‘‘मी  खो-खो टेलिव्हिजनवर पाहिला. हा खेळ अतिशय उत्कंठावर्धक आहे. खो-खो उत्तम खेळल्यास कोणालाही क्षेत्ररक्षणात तरबेज होता येईल.’’

‘‘मी भारतात आयपीएल किंवा अन्य काही खेळांच्या उपक्रमांसाठी येतो. त्यावेळी कबड्डी आणि खो-खो हे खेळ पाहण्यात आले. खो-खो खेळातील वेग, पदलालित्य हे सारे थक्क करण्याजोगे होते. हा खेळ मला खेळायला जरूर आवडेल. क्षेत्ररक्षणात वाक्बगार व्हायचे असेल, तर क्षेत्ररक्षणाचा प्रशिक्षक म्हणून खो-खो खेळायचा सल्ला मी जरूर देईन,’’ अशा शब्दांत ऱ्होड्सने खो-खो खेळाचे गोडवे गायले.

‘‘ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यासारख्या देशांमध्ये फुटबॉल, रग्बी हे खेळ मोठय़ा प्रमाणात खेळले जातात. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्तीमध्ये ते वरचढ असतात. मी कोणत्याही खेळाडूला झेल कसा पकडायचा याचे तंत्र शिकवू शकेन. परंतु तंदुरुस्तीचे धडे देऊ शकणार नाही. मात्र भारतीय खेळांमध्ये खो-खो या खेळात ही तंदुरुस्ती जोपासण्याची क्षमता आहे,’’ असे ऱ्होड्सने सांगितले.