अहमदाबाद येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये गुजरातच्या अक्षर पटेल यानं आपल्या फिरकीच्या तालावर इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवलं आहे. अक्षर पटेल यानं अचूक टप्यावर मारा करत इंग्लंडच्या फंलदाजांना एकापाठोपाठ एक तंबूत धाडलं. अक्षर पटेल यानं पहिल्या डावांत सहा गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे.‘लोकल बॉय’ अक्षर पटेल यानं लागोपाठ दुसऱ्या सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची किमया साधली आहे. चेन्नई कसोटीत पदार्पणात अक्षर पटेल यानं पाच बळी घेतले होते. आता आपल्या दुसऱ्या सामन्यातही सहा बळी घेण्याचा कारणामा केला आहे. मोदी स्टेडिअमवर सुरु असलेल्या कसोटी सामन्यात अक्षर पटेल यानं २१.४ षटकांत ३८ धावांच्या मोबदल्यात सहा गडी बाद केले आहेत. अक्षर पटेलच्या अचूक फिरकी माऱ्याच्या जोरावर भारतानं इंग्लंडच्या संघाला ११२ धावांवर रोखलं आहे.

अक्षर पटेल आणि आर. अश्विन यानं अचूक टप्यावर मारा करत इंग्लंडच्या फंलदाजांना अडचणीत टाकलं. अक्षर पटेल याला अनुभवी अक्षर पटेल यानं चांगली साथ दिली. अश्विन यानं तीन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. अश्विन आणि अक्षर पटेल या जोडीनं इंग्लंडच्या नऊ गड्याना बाद केलं.

भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारपासून सुरू झाला. दिवस-रात्र पद्धतीचा असलेला हा सामना गुलाबी चेंडूने खेळवण्यात येत आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळला जात आहे. या सामन्याला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थितीत असल्याने हा सामना खास ठरला. सामन्यात भारतीय गोलंदाजांनी धडाकेबाज सुरूवात केली. चार सामन्याची कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. उर्वरीत दोन्ही सामन्यात विजय मिळवून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याचा मानस भारतीय संघाचा आहे.