१९९९ : बांगलादेशचा संघ क्रिकेटचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना पाकिस्तानविरुद्ध १९८६मध्ये खेळला. मात्र, त्यानंतरच्या तीन विश्वचषकांमध्ये बांगलादेशचा संघ विश्वचषक स्पर्धा खेळण्यास पात्र ठरलेला नव्हता. परंतु १९९७मध्ये मलेशियात झालेल्या आयसीसी क्रिकेट स्पर्धेत बाजी मारल्याने बांगलादेशचा संघ दोन वर्षांनी होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरला. त्यामुळे बांगलादेश संघासाठी १९९९ हे वर्ष विश्वचषक स्पर्धेचे प्रवेशद्वार ठरले. मग मात्र त्यांनी क्रिकेटजगताला दखल घ्यायला लावली. १९९९च्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून बांगलादेशला पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या सामन्यात अन्य सहयोगी सदस्य स्कॉटलंडवर २२ धावांनी विजय मिळवत त्यांनी पहिल्या विजयाची नोंद केली. त्यानंतर बांगलादेशला पुन्हा ऑस्ट्रेलियाकडून दणदणीत पराभव पत्करावा लागला. पहिल्या विश्वचषकातील अखेरच्या सामन्यात पाकिस्तानसारख्या संघाला पराभूत करीत बांगलादेशने सर्वाधिक धक्कादायक विजयाची नोंद केली. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना २२३ धावा केल्या, तर पाकिस्तानचा संपूर्ण डाव १६१ धावांमध्येच संपुष्टात आला. त्यामुळे पहिल्याच विश्वचषकात माजी जगज्जेत्या पाकिस्तानला तब्बल ६२ धावांनी पराभूत करणे ही बांगलादेशची सर्वाधिक विशेष कामगिरी ठरली.

२००३ : हा विश्वचषक म्हणजे बांगलादेशसाठी मोठे दु:स्वप्नच होते. साखळी फेरीतील सहापैकी पाच सामन्यांमध्ये बांगलादेश संघाला पराभव पत्करावा लागला, तर एक सामना हा पावसामुळे वाया गेला. ‘ब’ गटात खेळणाऱ्या बांगलादेशाचा सामना प्रथमच विश्वचषकात खेळणाऱ्या कॅनडाशी झाला. कॅनडाचा संपूर्ण संघ केवळ १८० धावांमध्ये गारद झाला. मात्र बांगलादेशचा संघ तर त्या नवख्या संघाविरुद्धदेखील १२० धावांमध्ये गडगडला, तर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना बांगलादेशच्या फलंदाजीच्या प्रारंभीच जोरदार पाऊस कोसळल्याने तो सामना थांबवून दोन्ही संघांना एकेक गुण बहाल करण्यात आला. मात्र अशा अत्यंत वाईट कामगिरीमुळे बांगलादेशचा संघ त्यांच्या गटात अखेरच्या स्थानावर राहिला.

२००७ : या विश्वचषकात बांगलादेशाची कामगिरी खऱ्या अर्थाने प्रभावी ठरली. ‘ब’ गटातील पहिल्याच लढतीत बांगलादेश संघाकडून अव्वल खेळाडूंचा भरणा असलेल्या भारताच्या संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. भारताचा डाव १९१ धावांमध्ये संपुष्टात आल्यानंतर बांगलादेशच्या तमिम इक्बाल, मुशफकीर रहीम आणि शकिब अल हसन या तत्कालीन युवा त्रिकुटाने केलेल्या जिगरबाज अर्धशतकी खेळींच्या बळावर बांगलादेशाने भारताला ५ गडी आणि ९ चेंडू राखून सहज नमवले. या पराभवापासूनच भारताचे पाऊल अडखळले आणि भारताचा संघ साखळी फेरीतच गारद झाला, तर श्रीलंकेविरुद्ध मोठा पराभव पत्करल्यानंतर विश्वचषकात प्रथमच खेळणाऱ्या बम्र्युडा संघावर ७ गडी राखून मात करीत बांगलादेश संघाने ‘सुपर एट’पर्यंत मजल मारली. त्यानंतर ‘सुपर एट’मध्ये बांगलादेश संघाने दक्षिण आफ्रिकेसारख्या नामांकित संघालादेखील ६७ धावांनी पराभूत केले. बांगलादेशाने २५१ धावा केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव १८४ धावांवरच आटोपला. अन्य सामन्यांमध्ये मात्र बांगलादेशला पराभव पत्करावा लागल्याने त्यांची वाटचाल तिथेच संपुष्टात आली.

२०११ : भारत, श्रीलंका यांच्यासोबत बांगलादेशला सहयजमानपद भूषवण्याची प्रथमच संधी मिळाली. विश्वचषकातील प्रारंभीचा सामना आणि बांगलादेशचे अन्य सर्व साखळी सामने त्यांच्याच देशात झाल्याने त्यांच्यासाठी ही स्पर्धा विशेष होती. पहिला सामना भारत विरुद्ध बांगलादेश असा होता. त्यात भारताच्या वीरेंद्र सेहवागने केलेल्या तुफानी १७५ धावांच्या खेळीमुळे भारताने ३७० धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशाने ९ बाद २८३ धावा केल्याने त्यांना हा सामना ८७ धावांनी गमवावा लागला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशचा संपूर्ण डाव अवघ्या ५८ धावांमध्ये गडगडला. विंडिजने हा सामना ९ गडी राखून जिंकला. त्यानंतर बांगलादेशने आर्यलड संघाला २७ धावांनी पराभूत केले, तर इंग्लंडच्या संघाला दोन गडी राखून पराभूत करीत आश्चर्याचा धक्का दिला. मात्र, सरस धावगतीच्या बळावर इंग्लंड, वेस्ट इंडिज वरचढ ठरल्याने बांगलादेशची वाटचाल साखळीतच रोखली गेली.

२०१५ : या स्पर्धेतील ‘अ’ गटात इंग्लंड, श्रीलंका यांच्यासह अफगाणिस्तान आणि स्कॉटलंड या सहयोगी देशांचा समावेश होता. अफगाणिस्तानच्या संघाला १०५ धावांनी पराभूत केल्यानंतर बांगलादेशाला श्रीलंकेकडून ९२ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर स्कॉटलंडच्या कायले कोएत्झरने केलेल्या तुफानी दीडशतकी खेळीमुळे त्यांनी प्रथमच तीनशेहून अधिक म्हणजे ३१८ धावांचा डोंगर उभा केला. मात्र बांगलादेशाच्या फलंदाजांनी न डगमगता ६ गडी राखून ३२२ धावा करीत मोठय़ा धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. त्यानंतरच्या सामन्यात महम्मदुल्ला रियादने केलेल्या शतकी खेळीमुळे बांगलादेशाने २७५ धावा करीत इंग्लंडला आव्हान दिले. इंग्लंडचा डाव २६० धावांमध्येच संपुष्टात आल्याने बांगलादेश संघाने इंग्लंडवर १५ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे बांगलादेशच्या संघाने विश्वचषकात प्रथमच उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बांगलादेश आणि भारत यांच्यात झालेल्या लढतीत रोहित शर्माच्या शतकी खेळीमुळे भारताने ३०२ धावांपर्यंत मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव १९३ धावांवरच संपुष्टात आल्यामुळे त्यांची वाटचाल उपांत्यपूर्व फेरीतच रोखली गेली.