बार्सिलोनापाठोपाठ बायर्न म्युनिक संघाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने दमदार आगेकूच केली आहे. बायर्नने अर्सेनेलवर २-० अशी मात करत जेतेपदासाठी आपली दावेदारी सिद्ध केली. टोनी क्रूस आणि थॉमस म्युलरने प्रत्येकी एक गोल करत या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अर्सेनेलच्या मेसुट ओझिल आणि  डेव्हिड अलाबा यांनी पेनल्टी किकद्वारे गोल करण्याची संधी वाया घालवली. पहिल्या सत्रात अर्सेनेलच्या खेळाडूंनी गोलसाठी जोरदार प्रयत्न केले आणि चेंडूवर नियंत्रणही राखले. मात्र त्यांचा प्रमुख खेळाडू मेसुट ओझिलला सूर गवसला नाही. मध्यंतरानंतर काही मिनिटांतच बायर्नच्या अर्जेन रॉबेनने क्रूसला पास दिला आणि या पासचा उपयोग करून घेत त्याने सहज गोल केला. रॉबेन गोल करण्याच्या प्रयत्नात असताना अर्सेनेलचा गोलरक्षक स्किझेस्नीने त्याला पायाने अडवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे सामनाधिकाऱ्यांनी स्किझेस्नीला रेड कार्ड दाखवले आणि बायर्नला पेनल्टी किकची संधी मिळाली. विलंबानंतर त्याच्याऐवजी ल्युकाझ फॅबिअन्सकी मैदानावर आला. बायर्नतर्फे अलाबाने पेनल्टी किकची संधी घेतली, मात्र त्याचा प्रयत्न गोलपोस्टच्या बाहेरून गेला. मध्यंतरानंतर बायर्नने आपल्या डावपेचांमध्ये बदल केले. ८८व्या मिनिटाला म्युलरने सुरेख गोल करत बायर्नच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
अन्य लढतीत अ‍ॅटलेटिको माद्रिदने एसी मिलानवर १-० असा विजय मिळवला. अ‍ॅटलेटिकोतर्फे दिएगो कोस्टाने ८३व्या मिनिटाला एकमेव गोल केला.