अल्पावधीत जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या IPL स्पर्धेच्या आराखड्यात बीसीसीआय महत्वाचे बदल करण्याच्या तयारीत आहे. सध्या ८ संघांमध्ये खेळवण्यात येणारी ही स्पर्धा पुढील हंगामात ९ संघांनिशी खेळवली जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने यासाठी हालचालीही सुरु केल्याचं समजतंय.

“ICC चा Future Tour Program (FTP) आणि BCCI मध्ये झालेल्या चर्चेनुसार आयपीएलमधील सामन्यांची संख्या ही ७६ असावी असं ठरलं होतं. मात्र नवव्या संघाला प्रवेश दिल्यानंतरही बीसीसीआय ७६ सामन्यांमध्ये संपूर्ण स्पर्धेचं गणित जमवू शकते. त्यामुळे २०२३ पर्यंत ९ संघांनिशी खेळल्यानंतर पुढच्या हंगामात १० वा संघ आयपीएलच्या मैदानात उतरु शकेल.” BCCI मधील सुत्रांनी टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला माहिती दिली.

बीसीसीआयने या नवीन संघांसाठी २ हजार कोटी ही रक्कम ठरवली असून हे नवीन संघ नेमके कोणते असतील याबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे. १ डिसेंबरला आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची सर्वसाधारण बैठक पार पडली जाणार आहे, या बैठकीत नवीन संघांना संधी देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.