उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे ‘बीसीसीआय’कडून पृथ्वी शॉवर आठ महिन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पृथ्वीला क्रिकेटपासून दूर राहावं लागणार आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर पृथ्वीने ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये पृथ्वीने अनावधनाने चूक झाल्याचे म्हटले आहे. १९ वर्षीय पृथ्वी भारताकडून दोन कसोटी सामने खेळला असून त्याने एक शतक आणि एका अर्धशतकासह २३७ धावा फटकावल्या आहेत. १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या पृथ्वीने कसोटीत पदार्पणातच शतक झळकावण्याची किमया केली होती.

प्रामाणिकपणे मी माझी चूक स्वीकारत आहे. गेल्या स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त असताना औषधे घेताना माझ्याकडून हे घडले असावे. क्रिकेट हे माझे आयुष्य असून मुंबईचे तसेच देशाचे प्रतिनिधित्व करणे हेच माझ्यासाठी सर्वाधिक अभिमानास्पद आहे. लवकरात लवकर दमदार पुनरागमन करण्याचा माझा मानस आहे. असे ट्विट पृथ्वी शॉने केले आहे. ‘‘युवा खेळाडूंनी औषधे घेताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. माझ्या या चुकीमुळे अन्य खेळाडूंना समज मिळेल. खेळाडूंनी ‘वाडा’च्या नियमांचे पालन करण्याची नितांत आवश्यकता आहे,’’ असेही पृथ्वीने सांगितले.

पृथ्वीच्या निलंबनाचा काळ १६ मार्चपासून सुरू झाला असून १५ नोव्हेंबपर्यंत त्याला क्रिकेट खेळण्यास मनाई आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकांना तो मुकणार आहे. पृथ्वीसह विदर्भाचा अक्षय दुल्लारवार आणि राजस्थानचा दिव्या गजराज यांनाही याच कृत्यामुळे ‘बीसीसीआय’ने निलंबित केले आहे.

१९ वर्षीय पृथ्वीला गेल्या काही महिन्यांपासून विविध दुखापतींनी ग्रासले होते. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेदरम्यान पृथ्वीची उत्तेजक द्रव्य चाचणी घेण्यात आली होती. त्या चाचणीच्या निकालात पृथ्वीने टब्र्युटलाइन हे उत्तेजक घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेल्या पृथ्वी शॉ याला उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले आहे. खोकल्याच्या काही औषधांमध्ये आढळणारा मात्र बंदी असलेला घटक पृथ्वीने अजाणतेपणाने घेतल्याचे या प्राथमिक चाचणीत स्पष्ट झाले आहे,’’ असे ‘बीसीसीआय’ने सांगितले आहे.