राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि सदस्य गगन खोडा अशा दोन जागांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी अर्ज मागवले आहेत.

या जाहिरातीमध्ये निवड समितीचा कार्यकाळ चार वर्षांचा असेल असे, स्पष्ट केले असून शरणदीप सिंग (उत्तर), देवांग गांधी (पूर्व) आणि जतीन परांजपे (पश्चिम) या सदस्यांचा कार्यकाळ आणखी एक वर्ष बाकी आहे. वरिष्ठ निवड समितीमधील उर्वरित तीन सदस्यांना अध्यक्षपद भूषवता येणार नसल्यामुळे नव्या दोन सदस्यांपैकी एकाकडे हे पद जाणार आहे. भारतीय वरिष्ठ संघ, भारत ‘अ’ या संघांशिवाय दुलीप, देवधर, चॅलेंजर सीरिज आणि इराणी चषक स्पर्धेसाठी शेष भारत स्पर्धासाठी संघ निवड करण्याची जबाबदारी निवड समितीवर असेल. याशिवाय महिलांची संपूर्ण निवड समिती (५ पदे) आणि कनिष्ठ पुरुषांच्या निवड समितीवरील दोन पदांसाठी २४ जानेवारीपर्यंत अर्ज मागवले आहेत.