भारतीय क्रिकेट संघातून सध्या बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण, बीसीसीआयच्या उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला आहे. याबद्दल बीसीसीआयने युसूफ पठाणला ५ महिन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षात युसूफ पठाणने तब्येत बिघडलेली असताना उपचारासाठी काही औषध घेतली होती. मात्र ही औषधं बीसीसीआयने घालून दिलेल्या नियमांमध्ये बसत नाही. अशा औषधांचं सेवन केल्यास ते उत्तेजक द्रव्यांचं सेवन मानलं जातं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार युसूफने हे औषध घेतल्याचं समजतंय, मात्र हे औषध बीसीसीसीआयच्या नियमांमध्ये बसत नसल्याची कल्पना युसूफला नसल्याची माहिती त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी दिली आहे.

युसूफ पठाण राष्ट्रीय क्रिकेटमद्ये बडोद्याच्या संघाचं प्रतिनिधीत्व करतो. २०१२ नंतर मात्र युसूफ पठाणला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाहीये. आतापर्यंत युसूफ पठाणने भारताचं ७९ सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे. २००७ च्या टी-२० आणि २०११ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा युसूफ पठाण सदस्य होता.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफ पठाणने आजारातून बरं होण्याकरता ‘Brozeet’ नावाचं औषध घेतलं. श्वास घेण्यात अडचण येणाऱ्या रुग्णांना हे औषध दिलं जातं. मात्र या औषधातील ‘Terbutaline’ हा घटक उत्तेजक द्रव्यांमध्ये मोडला जातो. हे औषध घेण्याआधी युसूफ पठाण किंवा त्यांच्या डॉक्टरने परवानगी घेतली नसल्याचं समजतंय. यंदाच्या रणजी हंगामात युसूफने बडोद्याचं प्रतिनिधीत्व केलं. मात्र उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतर बीसीसीआयने बडोदा क्रिकेट असोसिएशनला पुढील स्पर्धांसाठी युसूफची संघात निवड करु नका असे आदेश दिले आहेत.