आव्हानात्मक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ‘बीसीसीआय’ प्रयत्नशील

वृत्तसंस्था, मुंबई</strong>

भारतात करोनाची साथ वेगाने पसरत असल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) यंदा देशांतर्गत क्रिकेट हंगामाचे आयोजन करणे जवळपास अशक्य आहे. इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजन करणाऱ्या ‘बीसीसीआय’ला सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत चालू हंगामातील कोणतीही स्थानिक स्पर्धा घेणे कठीण जाईल.

सर्व भागधारकांना आर्थिक लाभ देऊ शकतील, अशा काही स्थानिक स्पर्धाचे आयोजन करण्यासाठी ‘बीसीसीआय’ प्रयत्नशील आहे, असे संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुलीने सर्व राज्य संघटनांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. याचप्रमाणे यंदाच्या स्थानिक क्रिकेट हंगामाला कात्री लावण्यात येईल. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या स्वरूपातही बदल केले जातील, असे संकेत दिले होते. परंतु देशातील करोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रणजी करंडक, देवधर करंडक, दुलीप करंडक, विजय हजारे, सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२०, २३ वर्षांखालील वयोगटांसाठीची सी. के. नायडू करंडक स्पर्धा अशा अनेक स्पर्धापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत ‘बीसीसीआय’ने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

‘‘करोनाच्या पार्श्वभूमीवर सद्य:स्थितीत काही राज्यांमधील स्थिती वाईट आहे, तर काही राज्यांमध्ये अतिवाईट आहे. जिथे उद्याच्या स्थितीचा अंदाज मांडणे कठीण आहे, अशा परिस्थितीत तीन-चार महिन्यांच्या कालावधीच्या स्पर्धेची योजना कशी काय आखता येईल,’’ अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

जैव-सुरक्षित वातावरणाचे आव्हान

देशभरातील असंख्य क्रिकेटपटूंसाठी जैव-सुरक्षित वातावरणातील स्पर्धेचे आयोजन करणे कठीण आहे. ‘बीसीसीआय’ने देशांतर्गत क्रिकेटचे पुनरागमन केल्यानंतर अमलात येणारी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. परंतु जोवर सुरक्षिततेची हमी मिळत नाही, तोवर कोणतीही स्पर्धा होणार नाही, हे स्पष्ट केले आहे. ‘‘देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा घ्यायच्या झाल्यास प्रथम राज्य शासनांची परवानगी घ्यावी लागेल. मग शहरांतील पालिकांचा हिरवा कंदील आवश्यक असेल. या परवानग्या मिळाल्या तरी ३७ रणजी संघांसाठी, पाच दुलीप करंडक संघांसाठी आणि विविध स्थानिक संघांसाठी जैव-सुरक्षित वातावरण निर्माण करणे कठीण आहे. प्रवास आणि निवास ही आणखी दोन आव्हाने असतील,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले.