शरद पवार यांचे नाव चर्चेत *  राजीव शुक्लाही उत्सुक
जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी कोण बसणार, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. कार्यकाळ संपण्यापूर्वीच दालमिया यांचे निधन झाल्याने बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांना विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागणार असून त्यामध्ये बीसीसीआयचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. सध्याच्या घडीला बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दालमिया यांची प्रकृती चिंताजनक होती, ठाकूर हेच सारे व्यवहार पाहत होते. आता हे पद रिक्त झाल्यावर बीसीसीआयचे आजी-माजी पदाधिकारी यासाठी इच्छुक आहेत. यामध्ये पवार यांच्यासह राजीव शुक्ला आणि कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांचीही नावे आहेत. शुक्ला यांनी बीसीसीआयचे उपाध्यक्षपद भूषवले आहे. पण मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत कोषाध्यक्षपदासाठी ते रिंगणात असताना चौधरी यांनी त्यांना पराजित केले होते. चौधरी हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन
यांच्या मर्जीतले असून या संघटनेवर आपला  अंकुश ठेवण्यासाठी त्यांच्यापुढे चौधरी यांचा पर्याय असेल.

अध्यक्षपदासाठी शर्यतीत कोण?
शरद पवार
बीसीसीआय आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष व सध्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष शरद पवार बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी उत्सुक असल्याचे समजते. याबाबतची चर्चा त्यांनी एमसीएमधील काही निकटवर्तीयांशी केल्याचेही समजते. जोपर्यंत आपणच जिंकणार, हा विश्वास पवारांना वाटत नाही तोपर्यंत पवार त्या पदासाठी रिंगणात उतरत नाहीत. सध्याच्या घडीला पवार यांना कुणी कडवा विरोध करेल असे वाटत नसल्याचे म्हटले जात आहे. पण एन. श्रीनिवासन मात्र आपल्या निकटवर्तीयांना अध्यक्षपदावर बसवण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले जात असल्याने कदाचित पवार स्वत: या पदासाठी उभे न राहता आपल्या निकटवर्तीयांना उभे करून पडद्यामागून सूत्रे हाताळू शकतात.

अजय शिर्के
बीसीसीआयचे माजी पदाधिकारी आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय अजय शिर्के यांच्या नावाचीही बीसीसीआयच्या अध्यक्षपदसाठी चर्चा होती. दालमिया यांची प्रकृती काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याने त्यांना अरुण जेटली बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडण्याचे सांगणार होते आणि त्या वेळी अजय शिर्के यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. पण जर पवार यांनी इच्छा प्रदर्शित केली तर शिर्के या पदासाठी उभे राहणार नाहीत, हे निश्चित आहे.

राजीव शुक्ला
बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष आणि आयपीएलचे अध्यक्ष असलेले राजीव शुक्ला हे अध्यक्षपदासाठी उत्सुक असल्याचे समजते. पण मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये शुक्ला कोषाध्यक्षपदासाठी रिंगणात होते आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे या वेळी अध्यक्षपदासाठी ते उभे राहतील की त्यांना पाठिंबा देऊन कुणी उभे करते का, याची उत्सुकता साऱ्यांना आहे.

अनिरुद्ध चौधरी
एन. श्रीनिवासन यांचे सर्वात विश्वासू सहकारी अशी अनिरुद्ध चौधरी यांची ओळख आहे. या वर्षी मार्च महिन्यामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये कोषाध्यक्षपदासाठी ते रिंगणात होते आणि त्यांनी श्रीनिवासन यांच्या मदतीने राजीव शुक्ला यांना पराभूत करत साऱ्यांनाच जोरदार धक्का दिला होता. श्रीनिवासन या वेळी स्वत: अध्यक्षपदासाठी उभे राहू शकत नसल्याने त्यांच्यापुढे चौधरी यांचा सर्वोत्तम पर्याय खुला असेल. श्रीनिवासन यांच्यापुढे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांचा पर्याय असला तरी ते चौधरी यांनाच प्राधान्य देतील, असे म्हटले जात आहे.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदाबाबत काय?
कार्यकाळ संपण्यापूर्वी अध्यक्षपदाबाबत निर्णय घ्यायचा असल्यास त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागते. बीसीसीआयच्या ‘१६-ड’ या नियमानुसार सचिव अनुराग ठाकूर यांना २१ दिवसांमध्ये विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागणार आहे. तोपर्यंत ठाकूर हेच बीसीसीआयच्या अध्यक्षाने घ्यायचे निर्णय घेतील. अध्यक्षपदासाठी निवड करण्यासाठी एका विभागाने याबाबत प्रस्ताव मांडायला हवा. दालमिया हे पूर्व विभागाचे सदस्य असल्यामुळे या वेळी पूर्व विभागाला अध्यक्षपदासाठीचा प्रस्ताव ठेवावा लागणार आहे. या प्रस्तावावर एका विभागाचे अनुमोदन असणे आवश्यक असेल. या वेळी अध्यक्षपदासाठी निवड झालेली व्यक्ती हा कार्यकाळ संपेपर्यंत पदावर कायम राहील.
अध्यक्षपदासाठी निवडणूक होऊ शकते का?
अध्यक्षपदासाठी या वेळी निवडणूक होऊ शकते. २०१७ सालापर्यंत बीसीसीआयचा अध्यक्ष कोण असावा, याचा प्रस्ताव पूर्व विभाग ठेवणार आहे. पूर्व विभागामध्ये सहा संलग्न असोसिएशन आहेत. यामध्ये बंगाल, ओडिशा, झारखंड, आसाम, त्रिपुरा आणि कोलकाता या राष्ट्रीय क्लब्जचा समावेश आहे. गेल्या वेळी मार्च महिन्यात झालेल्या अध्यक्षपदासाठी या सहा संघटनांनी दालमिया यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. एकापेक्षा जास्त व्यक्ती अध्यपदासाठी इच्छुक असल्यास निवडणूक होऊ शकते. पण त्यासाठी त्या व्यक्तीकडे एका विभागाचा प्रस्ताव आणि दुसऱ्या विभागाचे अनुमोदन असणे अनिवार्य असेल. त्यामुळे सध्याच्या घडीला श्रीनिवासन आणि त्यांचा प्रतिस्पर्धी गट विविध विभागांना आश्वासन देत आहेत.