भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी२० मालिका १-१ शी बरोबरीत सुटली, तर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. या मालिकेतील अंतिम सामना अद्याप शिल्लक आहे. हा दौरा अनेक कारणांनी लोकप्रिय ठरत आहे. पण BCCI ने एक व्हिडीओ ट्विट केला असून तो व्हिडीओ पूर्ण २०१८ या वर्षात प्रचंड पसंतीस पडला आहे.

हा व्हिडीओ भारत आणि विंडीज यांच्यातील मालिकेचा आहे. भारतात ही मालिका खेळण्यात आली. विंडीजविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यातील हा व्हिडीओ आहे. सामन्यात भारताने ३७७ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी विंडीजचा संघ मैदानात आला. त्या डावातील पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हेमराज चंद्रपॉलने चेंडू सीमारेषेच्या दिशेने लगावला. चेंडूच्या मागे विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा दोघेही धावले. ते धावत असताना त्यांच्यात धावण्याची शर्यतच सुरु आहे की काय असे वाटले. अखेर जाडेजाने तो चेंडू हाताने सीमारेषेच्या आत रोखला आणि विराटने तो चेंडू फेकला.

 

चौथ्या सामन्यात भारताकडून रोहित शर्माने १६२ धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने २० चौकार आणि ४ षटकार लगावले होते. पण याच सामन्यात अंबाती रायडूनेही १०० धावा ठोकल्या होत्या. हा सामना भारताने २२४ धावांनी जिंकला होता.