आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं विजेतेपद मिळवल्यापासून रोहित शर्माला भारतीय टी-२० संघाचं कर्णधारपद सोपवावं अशी मागणी सोशल मीडियावर होताना दिसत आहे. क्रिकेट चाहत्यांसोबत काही माजी क्रिकेटपटूंनीही या मागणीला आपला पाठींबा दर्शवला आहे. काही खेळाडूंनी सध्या संघात बदल करण्याची गरज नसल्याचं म्हणत विराटला आपला पाठींबा दिला आहे. परंतू आयपीएलमध्ये RCB संघाकडून खेळणाऱ्या विराटच्या सहकाऱ्यानेच रोहितला टी-२० विश्वचषकाआधी संघाचं कर्णधारपद मिळायला हवं असं भाष्य केलं आहे.

अवश्य वाचा – अजिंक्य रहाणे आक्रमक कर्णधार ! इयन चॅपल यांच्याकडून कौतुक

“एक संघ कसा घडवायचा असतो हे रोहित शर्माने आपल्याला दाखवून दिलं आहे. स्पर्धा कशी जिंकायची हे त्याने दाखवून दिलं आहे. एका प्रकाराचं कर्णधारपद रोहितकडे देण्यात कसालही धोका आहे असं मला वाटत नाही. यामुळे विराटच्या खांद्यांवर असणारं दडपणही कमी होईल. रोहितने आयपीएल आणि काही स्पर्धांमध्ये भारताला विजेतेपद मिळवून दिलंय. त्यामुळे दडपणाखाली तो कसा निर्णय घेतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल. आयपीएलमध्ये प्रत्येक हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ स्थिरावलेला नसतो, परंतू रोहितने अशा खेळाडूंसोबतही स्पर्धा कशी जिंकायची हे दाखवून दिलंय. जर रोहित शर्मा फिट असेल तर टी-२० विश्वचषकाआधी त्याला कर्णधारपद मिळायला हवं.” पार्थिव पटेल Sports Tak शी बोलत होता.

९ डिसेंबरला सकाळी सोशल मीडियावरुन पार्थिवने आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. ३५ वर्षीय पार्थिव पटेलने आतापर्यंत २५ कसोटी, ३८ वन-डे आणि दोन टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. भारतीय संघाकडून पार्थिवला फारशी संधी मिळाली नसली तरीही स्थानिक क्रिकेटमध्ये पार्थिवने गुजरातचं १९४ सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे. २००२ साली वयाच्या १७ व्या वर्षी पार्थिव पटेलने भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सुरुवातीची काही वर्ष चांगला खेळ केल्यानंतर पार्थिवच्या कामगिरीत घसरण झाली. यानंतर २००४ साली दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंह धोनीच्या आगमनानंतर पार्थिवने संघातली आपली जागा गमावली. भारतीय संघाकडून संधी मिळत नसली तरीही आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये पार्थिव खेळत होता.