भारताच्या महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी आणि ग्रँडमास्टर एस. पी. सेतुरामन यांनी आशियाई खंडनिहाय महिला आणि खुल्या बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेत सुवर्णपदकाला गवसणी घालून इतिहास घडवला.
संपूर्ण स्पध्रेत शानदार कामगिरी करणाऱ्या भक्तीने अखेरच्या फेरीत व्हिएतनामच्या होआंग थि बाओविरुद्धची लढत बरोबरीत सोडवून अव्वल स्थान पटकावले. भक्तीने सर्वाधिक ७ गुणांची कमाई केली. कझाकस्तानच्या दिनारा सादुआकासोव्हा आणि भारताच्या सौम्या स्वामिनाथन यांच्यापेक्षा ती अध्र्या गुणाने वरचढ ठरली. सौम्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. याचप्रमाणे पुढील वर्षी होणाऱ्या महिला विश्व अजिंक्यपद स्पध्रेसाठी भक्ती आता पात्र ठरली आहे.
काळ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या सेतुरामनने चीनच्या वेई यि याचा पराभव केला. सेतुरामच्या खात्यावरसुद्धा ७ गुण जमा होते. २०१७मध्ये बातुमा (जॉर्जिया) येथे होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ स्पध्रेसाठी आता तो पात्र ठरला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2016 3:26 am