Birmingham 2022 Commonwealth Games : कॉमनवेल्थ गेम्स महासंघाने (CGF) बर्मिंगहममध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ च्या वेळापत्रकात छोटासा बदल केला आहे. स्पर्धेच्या तारखेतील बदल हा खूप मोठा नसून अवघ्या २४ तासांचा आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे नियोजित वेळापत्रक हे २७ जुलै ते ७ ऑगस्ट २०२२ असे होते. पण आता या खेळांचे आयोजन २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ या कालावधी दरम्यान केले जाणार आहे. महासंघाने एका निवेदनाद्वारे स्पर्धेच्या तारखेमध्ये करत असलेल्या बदलासंदर्भातील माहिती दिली.

“CGF आणि बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ आयोजन समिती यांच्याकडून तारखांमध्ये करण्यात आलेला बदल ही दोन्ही संस्थांची संयुक्त घोषणा आहे. करोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनदर्शिकेत काही बदल होत आहेत. परिणामी, राष्ट्रकुल स्पर्धेच्या तारखांमध्येही बदल करण्यात आला आहे”, अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे टोक्यो ऑलिम्पिक २०२० आणि अमेरिकेतील वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा (२०२१) हे एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आलेले आहे. या संदर्भातील गोष्टींचा अभ्यास करून राष्ट्रकुल स्पर्धांच्या तारखांमध्ये बदल केल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती कठीण आहे, पण तरीदेखील आम्ही त्या परिस्थितीत राष्ट्रकुल स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पडाव्या यासाठी कायम एकत्रित प्रय़त्न करत राहू, असे CGF चे अध्यक्ष डेम लुइस मार्टिन म्हणाले.