क्रिकेटच्या मैदानावर अनेक चांगल्या आणि वाईट घटना घडतात. पण ऑस्ट्रेलियाच्या मार्श कप स्पर्धेत एक अत्यंत विचित्र घटना पहायला मिळाली. टास्मानिया संघाचा अष्टपैलू खेळाडू गुरिंदर संधू याने आपल्या अ श्रेणी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळ केला. क्वीन्सलँड संघाविरूद्ध त्याने सोमवारी झालेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मदत केली. पण तो ज्या पद्धतीने बाद झाला ती पद्धत खरंच विचित्र होती. क्रिकेटच्या अत्यंत सर्वसाधारण शिबिरांमध्येही जी चूक फलंदाजाला माफ नसते, ती चूक झाल्याने संधू बाद झाला.

क्रिकेट जगतातील एक अत्यंत विचित्र रन आऊटमध्ये संधूच्या बाद होण्याची गणती होईल. अ श्रेणी क्रिकेटमध्ये संधूची आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी नाबाद २१ होती. पण या सामन्यात त्याने दमदार खेळी केली. त्याने जेम्स फॉक्नरच्या साथीने चांगली भागीदारी रचली. संधू ४९ धावांवर खेळत होता. त्यावेळी त्याने फटका खेळला. दोन धावा काढून झाल्यावर त्यांना तिसरी धाव घेण्याचा मोह आवरला नाही. संधू तिसरी धाव घेताना अगदी रमतगमत क्रिजच्या आत पोहोचत होता. त्यावेळी फिल्डरने फेकलेला चेंडू थेट स्टंपवर लागला आणि आळशीपणाचा फटका संधूला बसला.

पहा हा व्हिडीओ

संधूलादेखील आपली चूक समजली. त्याने लगेच तंबूचा रस्ता धरला आणि तंबूत परतत असतानाच त्याने डोक्याला हात लावला.