भारताच्या महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम आणि लोव्हलिना बोरगोहेन यांनी पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये एलिट महिला बॉक्सर राष्ट्रीय शिबिर सुरू आहे. हे शिबिर जुलैपर्यंत चालणार आहे.

 

ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरलेल्या बॉक्सिंगपटूंसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मेरी कोम सहा वेळा विश्वविजेती असून लोव्हलिनाने दोन वेळा विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. मेरी कोम आणि लोव्हलिना व्यतिरिक्त, कोचिंग आणि सपोर्ट स्टाफ टीमच्या चार सदस्यांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला.

‘भय इथले संपत नाही’ अशाच परिस्थितीतून सध्या देश जात असल्याचे भयावह दृश्य आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसला असून, देशात करोनाने रौद्रवतारच घेतला आहे. गेल्या २४ तासांत देशात ३,४८,४२१ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर एकूण करोनाबळींची संख्या २,५४,१९७ वर गेली आहे.

प्रचंड वेगाने होत असलेला संसर्ग आणि अपुऱ्या पडत असलेल्या आरोग्य सुविधा, यामुळे देशात अनेक करोनाबाधितांचे उपचार मिळण्याआधीच तर काहीचे ऑक्सिजन वा इतर कारणांनी प्राण जात आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून साडेतीन ते चार हजारांच्या सरासरीने मृत्यूंची नोंद होत असून, मंगळवारी करोनाबळींची संख्या नव्या उच्चांकावर पोहोचली आहे.