गोलरक्षक पी.आर.श्रीजेश याने केलेल्या नेत्रदीपक बचावामुळेच भारतास आशिया चषक हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळविता आले. त्यांनी दक्षिण कोरियास २-० असे हरविले.
पूर्वार्धात सहाव्या मिनिटाला व्ही.आर.रघुनाथ याने भारतास आघाडीवर नेले. उत्तरार्धात सामन्याच्या ६५ व्या मिनिटाला मनदीपसिंग याने भारताचा दुसरा गोल नोंदविला. भारताने पहिल्या सामन्यात ओमान संघास ८-० अशी धूळ चारली होती. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील मुख्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी भारतास या स्पर्धेत विजेतेपद पटकाविण्याची आवश्यकता आहे.
या स्पर्धेत भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानने यापूर्वीच उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. त्यांनी यजमान मलेशियावर ४-१ असा शानदार विजय मिळविला.
या सामन्यातील भारताच्या विजयाचे श्रेय श्रीजेश याला द्यावे लागेल. त्याने किमान सहासात गोल वाचविले. सामन्यात कोरियाच्या खेळाडूंनी केलेल्या अनेक चाली त्याने सहज परतविल्या. त्यांना पूर्वार्धातच पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले होते मात्र त्यांचे हे सर्व प्रयत्न भारताच्या श्रीजेशने रोखले. सामन्याचा मानकरी हे पारितोषिकही त्यालाच देण्यात आले.
उत्तरार्धातही कोरियन खेळाडूंनी सातत्याने चाली करीत भारतीय खेळाडूंवर दडपण ठेवले होते. ५१ व्या मिनिटाला त्यांच्या कांग मुआन क्विआन याला गोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती मात्र त्याने मारलेला फटका श्रीजेशने अप्रतिमपणे अडविला. भारताला या सामन्यात गोल करण्याच्या अगदी मोजक्याच संधी मिळाल्या. त्यापैकी दोन संधींचा पुरेपूर फायदा घेत त्यांनी गोल केले.