ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज नॅथन लायन आपला १०० वा कसोटी सामना खेळत आहे. सध्याच्या कसोटी संघात लायन ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधीक अनुभवी गोलंदाज आहे. ब्रिस्बेन येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यासमोर दुबळीच दिसत आहे. मात्र, अननुवी गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकप्रकारे भारतीय अ संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

आणखी वाचा- IND vs AUS: नटराजनने मैदानात उतरताच रचला इतिहास; ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच भारतीय

नॅथन लायन, मिचेल स्टार्क, कमिन्स, हेजलवूड आणि कॅमरुन ग्रीनसारख्या अनुभवी गोलंदाजासमोर भारतीय गोलंदाजाची फळी कमकुवत भासत आहे. ऑस्ट्रेलियाच्या सर्व गोलंदाजांच्या नावावर एकूण १०१३ विकेट आहेत. तर भारतीय संघाच्या गोलंदाजाच्या नावावर फक्त १३ विकेट आहेत. अनुभवी रविंद्र जाडेजा, बुमराह आणि आर. अश्विन यांना तिसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्याला तिन्ही गोलंदाज मुकले आहेत. त्याशिवाय याआधी मोहम्मद शमी आणि उमेश यादव हे अनुभवी गोलंदाजीही दुखापतीमुळे बॉर्डर-गावसकर मालिकेला मुकले आहेत. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर गेले होते. अशा परिस्थितीत भारतीय संघात सर्व नवीन गोलंदाज आहेत.

आणखी वाचा- भारतीय कसोटी इतिहासात ७ वर्षात पहिल्यांदाज घडली ‘ही’ गोष्ट

सध्याच्या भारतीय संघातील गोलंदाजीवर नजर मारल्यास भारतीय संघाकडे अनुभवाची कमतरता असल्याचं भासेल. आर. अश्विनच्या जागी वॉशिंगटन सुंदर याला संधी देण्यात आली आहे. सुंदरनं आपलं कसोटी पदार्पण केलं आहे. त्याशिवाय बुमराहच्या जागी टी. नटराजन याला संधी देण्यात आली आहे. नटराजन यानंही आपलं कसोटी पदार्पण केलं आहे. त्याशिवाय रविंद्र जाडेजाच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, टी. नटराजन आणि वॉशिंगटन सुंदर या सर्वांकडे फक्त ४ कसोटी सामन्याचा अनुभव आहे. या सर्वांच्या नावावर १३ बळींची नोंद आहे. याउलट चित्र ऑस्ट्रेलियाच्या संघातील आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात अनुभवी गोलंदाजांचा भरणा आहे. नॅथन लायन, मिचेल स्टार्क, कमिन्स, हेजलवूड आणि कॅमरुन ग्रीन यांच्याकडे २४६ कसोटींचा अनुभव असून १००० पेक्षा जास्त बळी नावावर आहेत. पाहुयात ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतोय…