जागतिक क्रमवारीत भारताच्या किदम्बी श्रीकांतने दुसरं स्थान पटकावत या वर्षात सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. जागतिक बॅडमिंटन परिषदेने काल सुधारीत क्रमवारी जाहीर केली. गेल्या काही दिवसांत डेन्मार्क आणि फ्रेंच ओपन सुपरसीरिज स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्याचा श्रीकांतला फायदा झालेला आहे. या वर्षात आतापर्यंत श्रीकांतने ४ सुपरसीरिज स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि फ्रेंच या स्पर्धांत विजेतेपदासह सिंगापूर ओपन स्पर्धेतचं उप-विजेतेपदही श्रीकांतच्या नावावर आहे.

याआधी एकाही भारतीय खेळाडूने एका वर्षात ४ स्पर्धांची विजेतेपदं पटाकावण्याचा पराक्रम केला नाहीये. दोन आठवड्यांच्या कालावधीत श्रीकांतने जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. याआधी २०१५ साली श्रीकांत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहचला होता.

अवश्य वाचा – बॅडमिंटनमधील चीनी वर्चस्व लवकरच संपुष्टात येईल : किदम्बी श्रीकांत

प्रणॉयच्या क्रमवारीतही सुधारणा –

फ्रेंच ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीत श्रीकांतकडून हार पत्करणाऱ्या एच. एस. प्रणॉयच्या कामगिरीतही यावेळी सुधारणा झालेली पहायला मिळते आहे. सध्या प्रणॉयने जागतिक क्रमवारीत ११ वं स्थान मिळवलं असून त्याच्या कारकिर्दीतली ही सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे.

याव्यतिरीक्त साई प्रणीतच्या क्रमवारीत घसरण होऊन तो १६ व्या स्थानावर फेकला गेला आहे, तर अजय जयरामच्या क्रमवारीत सुधारणा होऊन त्याला २२ वं स्थान मिळालं आहे. समीर आणि सौरभ वर्मा हे खेळाडू आपल्या १८ आणि ४१ या स्थानावर कायम राहिले आहेत. तर राष्ट्रकुल खेळांमध्ये पदक विजेत्या परुपल्ली कश्यपच्या कामगिरीत सुधारणा होत, त्याला ४५ वं स्थान मिळालं आहे.

सायना-सिंधूचं स्थान कायम –

एकीकडे भारताच्या पुरुष खेळाडूंनी आपल्या कामगिरीत सुधारणा करुन क्रमवारीत आपला दबदबा कायम ठेवला आहे. मात्र दुसरीकडे पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवालच्या क्रमवारीत कसलाही बदल झालेला नाहीये. दोनही खेळाडूंनी आपलं याआधीचं स्थान कायम राखलं आहे.

अवश्य वाचा – अव्वल स्थान महत्वाचं, पण त्यासाठी झोपेशी तडजोड नाही – किदम्बी श्रीकांत

दुहेरी जोडीची लक्षवेधक कामगिरी –

सत्विकसाईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय पुरुष दुहेरी जोडीने आपल्या खेळाने सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली. फ्रेंच ओपन सुपरसीरिज स्पर्धेत या जोडीने तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांना पराभवाचा धक्का दिला आहे. त्यांच्या या कामगिरीने त्यांना दुहेरी जोडीच्या क्रमवारीत २८ वं स्थान मिळालं आहे. याव्यतिरीक्त मनु अत्री आणि बी. सुमीत रेड्डी या जोडीने क्रमवारीत ३३ वं स्थान मिळवलं आहे.

महिलांमध्ये आश्विनी पोनाप्पा आणि एन. सिकी रेड्डी या जोडीने क्रमवारीत २५ वं स्थान मिळवलंय. तर मिश्र दुहेरी जोडीत आश्विनी पोनाप्पा आणि जेरी चोप्रा जोडीच्या क्रमवारीत फारसा बदल न होता त्यांचं १६ वं स्थान कायम राहिलं आहे.