आंद्रे रसेलच्या वादळी खेळीनंतरही कोलकाता नाइट रायडर्सला शुक्रवारी रात्री रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुकडून निसटता पराभव पत्करावा लागला होता. रविवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये रसेलला रोखण्यासाठी बलाढय़ सनरायजर्स हैदराबाद कोणते चक्रव्यूह रचते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘आयपीएल’ गुणतालिकेत हैदराबाद आणि कोलकाता या दोन्ही संघांच्या खात्यांवर प्रत्येकी ८ गुण जमा आहेत. परंतु हैदराबादचा संघ एक सामना कमी खेळल्यामुळे त्यांनी आघाडी घेतली आहे. हैदराबादने चेन्नईला हरवून आपली सलग तीन पराभवांची मालिका खंडित केली. याचप्रमाणे कोलकाताला सलग चार पराभवांनंतर विजयाची प्रतीक्षा आहे. बाद फेरी गाठण्याचा संघर्ष आता तीव्र होत असल्याने रविवारी दुपारी होणारा हा सामना रंगतदार होईल, अशी क्रिकेटरसिकांची अपेक्षा आहे.

शुक्रवारी बेंगळूरुविरुद्धच्या सामन्यात रसेल आणि नितीश राणाने अखेरच्या षटकांमध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी करीत संघाला विजयासमीप आणले. परंतु दुर्दैवाने विजयाने त्यांना हुलकावणी दिली. रॉबिन उथप्पा धावांसाठी झगडत असताना रसेलला उशिराने फलंदाजीला पाठवण्याच्या निर्णयावर टीका होत आहे.

हैदराबादच्या फलंदाजीची मदार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्यावर आहे. बेअरस्टो इंग्लंडच्या विश्वचषक तयारीसाठी एप्रिलच्या अखेरच्या आठवडय़ात मायदेशी परतणार आहे. हैदराबादच्या मधल्या फळीकडून अपेक्षेप्रमाणे योगदान अद्याप मिळू शकलेले नाही. भारताच्या विश्वचषक संघात स्थान मिळवणाऱ्या विजय शंकरने आठ सामन्यांत फक्त १४० धावाच केल्या आहेत. मोठी खेळी उभारण्यात तो अपयशी ठरला आहे. कर्णधार केन विल्यम्सननेही निराशा केली आहे.

‘‘रसेलला जेरबंद करण्यासाठी आमच्याकडे रशीद खान किंवा संदीप शर्मासारखे गोलंदाज आहेत. धिम्या गतीने चेंडू टाकून ते रसेलला बाद करू शकतात. रसेल अप्रतिम खेळत आहे. परंतु तोसुद्धा माणूस आहे. त्यामुळे त्याला बाद करता येईल,’’ असे बेअरस्टोने सांगितले.

कोलकाता नाईट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार व यष्टीरक्षक), रॉबिन उथप्पा, ख्रिस लीन, शुभमन गिल, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रेथवेट, सुनील नरेन, पीयूष चावला, कुलदीप यादव, निखिल नाईक, जोए डेन्ली, श्रीकांत मुंढे, नितीश राणा, संदीप वारियर, प्रसिध कृष्णा, लॉकी फग्र्युसन, हॅरी गुरने, के. सी. करिअप्पा, यारा पृथ्वीराज, मॅट केली.

सनरायजर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), मनीष पांडे, मार्टिन गप्टिल, रिकी भुई, डेव्हिड वॉर्नर, दीपक हुडा, मोहमद नबी, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, अभिषेक शर्मा, विजय शंकर, श्रीवत्स गोस्वामी, जॉनी बेरिस्टो, वृद्धीमान साहा, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, बॅसिल थम्पी, बिली स्टॅनलेक, टी. नटराजन, संदीप शर्मा, शाहबाझ नदीम.

* सामन्याची वेळ : दुपारी ४ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ं