खेळाडूंनी पुकारलेल्या बंदचा फटका बांगलादेशच्या स्थानिक क्रिकेटपटूंना बसणार असला, तरी राष्ट्रीय संघाचा कर्णधार शकिब अल हसनने मध्यवर्ती कराराचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार बांगलादेश क्रिकेट मंडळ (बीसीबी) करत आहे.

येत्या काही दिवसांत बांगलादेशचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येत असून बीसीबीने ही कारवाई केली तर त्यामुळे संघाचे मनोधैर्य खचण्याची शक्यता आहे. शाकिबने ‘ग्रामीणफोन’ या दूरसंचार कंपनीशी करार करत बीसीबीच्या मध्यवर्ती कराराचा भंग केला आहे.

याप्रकरणी बीसीबीचे अध्यक्ष नझमुल हसन म्हणाले की, ‘‘शकिबने समाधानकारक उत्तर दिले नाही, तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. शकिब अशा प्रकारचा करार करू शकत नाही तसेच त्याने हा करार का करू नये, हे मध्यवर्ती करारात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. रॉबी ही दूरसंचार कंपनी आमची मुख्य प्रायोजक आहे. ग्रामीणफोन काही खेळाडूंना एक ते दोन कोटी टाका (बांगलादेशचे चलन) देऊन करारबद्ध करत आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांंत बीसीबीचे ९० कोटी टाकाचे नुकसान झाले आहे.’’