17 July 2019

News Flash

चणपटिया ते मुंबई व्हाया कॅरम!

कठीण परिस्थतीवर मात करणाऱ्या २२ वर्षीय काजल कुमारीचा प्रेरणादायी प्रवास

|| ऋषिकेश बामणे

कठीण परिस्थतीवर मात करणाऱ्या २२ वर्षीय काजल कुमारीचा प्रेरणादायी प्रवास

स्त्रियांनी डोक्यावर पदर घेऊन वावरण्याची जुनी परंपरा, क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडवण्याला घरच्यांचा विरोध, गावातील असंख्य घरांमध्ये अनियमित वीजपुरवठा अशा अनेक अडथळ्यांवर मात करत वयाच्या २०व्या वर्षी बिहारच्या चणपटिया भागातून मुंबईत नशीब अजमावण्यासाठी आलेल्या काजल कुमारीने दोन वर्षांत कॅरममध्ये स्वत:चा ठसा उमटवला आहे. सध्या ती मुंबईतील लोखंडवाला परिसरात आई-वडिलांसह राहात असून, ती इंडियन ऑइलचे प्रतिनिधित्व करते.

गतवर्षी दक्षिण कोरिया येथे झालेल्या विश्वचषक कॅरम स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या संघाची काजल सदस्य होती. याचप्रमाणे २०१५-१६ मध्ये बिहारच्याच रश्मी कुमारीच्या सलग पाच राष्ट्रीय विजेतेपदांची मालिका काजलने खंडित केली. याशिवाय राज्य अजिंक्यपद व राज्यस्तरीय अशा अनेक स्पर्धामध्ये तर काजलचे किमान उपविजेतेपद ठरलेलेच. आतापर्यंत चार वेळा फेडरेशन चषक पटकावणाऱ्या काजलला कॅरमची कारकीर्द म्हणून निवड करताना कौटुंबिक विरोधाला सामोरे जावे लागले.

‘‘वडील संजय कुमार यांना कॅरमची आवड असल्याने घरात कॅरम बोर्ड होता. त्यांना पाहून मलादेखील कॅरम खेळण्याची इच्छा झाली. २००५ मध्ये वयाच्या नवव्या वर्षी उपकनिष्ठ स्पर्धेसाठी बिहारच्या संघामध्ये माझी निवड झाली. त्या वेळी घरातील इतर वडीलधाऱ्या माणसांनी मला विरोध दर्शवला. स्पर्धाच्या निमित्ताने विविध शहरांचे दौरे करावे लागणार या भीतीने त्यांनी माझे मन वळवण्याचा प्रयत्न केला; परंतु वडिलांच्या पाठिंब्यामुळे मी त्या स्पर्धेत सहभागी होऊ शकले,’’ असे काजलने तिच्या सुरुवातीच्या कारकीर्दीविषयी सांगितले.

कोरियातील विश्वचषकात स्विस लीग या वेगळ्या प्रकारात काजलने श्रीलंकेच्या चमिल कूरेला सलग सात फेऱ्यांमध्ये पराभूत करण्याची किमया साधली होती. कारकीर्दीतील हा क्षण आपल्याला नेहमीच लक्षात राहील, असे काजलने नमूद केले.

आतापर्यंतच्या कारकीर्दीत सर्वाधिक योगदान कोणाचे लाभले, याविषयी विचारले असता काजल म्हणाली, ‘‘आजच्या घडीला एकापेक्षा एक उत्तम कॅरमपटू आहेत. मात्र अरुण केदार यांच्या मार्गदर्शनामुळे मला प्रत्येक स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यासाठी नेमकी कोणती अतिरिक्त मेहनत घ्यायची आहे, हे उमगले. त्यामुळे अरुण सरांशिवाय मी कॅरममध्ये इथवर मजलच मारू शकली नसती. त्याशिवाय अनुपमा केदार यांनीदेखील मी मुंबईत आल्यापासून मला स्वत:च्या मुलीसारखी वागणूक दिली. बिहार कॅरम संघटनेचे सचिव भरत भूषण यांनीही सुरुवातीच्या काळात मला सहकार्य केल्याने मी त्यांची सदैव ऋणी राहीन.’’

फेब्रुवारीत कुडाळला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत काजलला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. मात्र त्यामुळे निराश न होता तिने या वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी तयारीला सुरुवात केली असून, त्यापूर्वी होणाऱ्या फेडरेशन चषक स्पध्रेत विजेतेपद मिळवण्याचे ध्येयही तिने उराशी बाळगले आहे.

२०१८च्या विश्वचषकानंतर काजल जेव्हा तीन वर्षांनी बिहारला परतली, त्या वेळी तिच्या घरी असंख्य पुष्पगुच्छ जमा झाले होते. ‘‘गतवर्षी ज्या वेळी मी बिहारला गेले त्या वेळी कुटुंबातील व्यक्तींशिवाय गावातील मंडळी माझे अभिनंदन करण्यासाठी जमा झाले होते. त्यामुळे फार आनंद झालाच. शिवाय कॅरम खेळाकडे मुलींना वळवण्यासाठीही प्रेरित केले,’’ असे काजल म्हणाली.

First Published on March 16, 2019 1:27 am

Web Title: carrom sport in india