माहिती अधिकारांतर्गत क्रीडा मंत्रालयाचा खुलासा

मुंबई : केंद्र सरकारने कोणत्याही खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिलेला नाही, असे केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्य़ातील एका शिक्षकाने यासंदर्भात माहिती अधिकाराद्वारे माहिती मागवली होती. त्यावर क्रीडा मंत्रालयाने हा खुलासा केला आहे.

साधारणपणे हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे, असा समज लोकांमध्ये होता. मात्र आता माहिती अधिकाराद्वारे याबाबतची सत्यता समोर आली आहे. व्ही. के. पाटील आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षक असणाऱ्या मयुरेश अग्रवाल यांना क्रीडा मंत्रालयाकडून १५ जानेवारी २०२० रोजी यासंदर्भातील पत्र आले. त्यावर ‘केंद्र सरकारने कोणत्याही खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिलेला नाही. सरकार प्रत्येक खेळाला चालना, प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे,’ असे या पत्रात म्हटले आहे.