गबाला, अझरबैजान येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पध्रेतील ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात अंतिम फेरीत आठव्या स्थानावर समाधान मानावे लागलेल्या चैन सिंगने ऑलिम्पिकवारी पक्की केली.
चैनने पात्रता फेरीत १२०० पैकी ११७४ गुणांची कमाई करीत अंतिम फेरी गाठली. ऑलिम्पिककरिता पात्र होण्यासाठी आवश्यक गुणांचा निकष पूर्ण झाल्याने चैन रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होईल. अंतिम लढतीत ४०३.७ गुणांसह त्याने आठवे स्थान मिळवले. याआधी झालेल्या तीन विश्वचषक स्पर्धामध्ये निसटत्या फरकाने चैनची ऑलिम्पिक पात्रतेचे निकष चुकले होते. दोन दिवसांपूर्वी प्रकाश नान्जप्पाने ५० मीटर एअर पिस्तूल प्रकारात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान पटकावला होता.
‘ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकण्याचे माझे स्वप्न आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवल्याने प्रचंड आनंद झाला आहे. अजून कामगिरीत खूप सुधारणा आवश्यक आहे’, असे चैन सिंगने सांगितले.