ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतून आव्हान संपुष्टात येण्यापूर्वी सोमदेव देववर्मन याने जागतिक क्रमवारीतील २६व्या स्थानावरील जेर्झी जॅनोविक्झला जबरदस्त टक्कर दिली. तथापि, सानियाला मिर्झा आणि तिची अमेरिकन साथीदार बेथानी मॅटेक-सँड्स यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. याचप्रमाणे रोहन बोपण्णा आणि महेश भूपती यांनी आपल्या साथीदारांसमवेत दुसरी फेरी गाठली आहे. यामुळे भारतासाठी बुधवारचा दिवस हा संमिश्र स्वरूपाचा ठरला.
ग्रँड स्लॅम स्पध्रेत आपला ठसा उमटवू पाहणाऱ्या सोमदेवने पहिले दोन सेट छान आघाडी घेतली होती. परंतु चार तास रंगलेल्या या पुरुष एकेरीच्या सामन्यात जेर्झीने विजय नोंदवला. सोमदेवने ७-६(१०), ६-३, १-६, ०-६, ५-७ अशा फरकाने हा सामना गमावला.
महिला दुहेरीमध्ये दहाव्या मानांकित सानिया-बेथानी जोडीने स्पेनच्या बिगरमानांकित सिल्व्हिया सोलेर-ईस्पिनोसा आणि कार्ला सुआरेझ नवारो यांच्याकडून ६-७ (४), ३-६ अशी हार पत्करली.
पुरुष दुहेरीमध्ये बोपण्णाने अमेरिकेच्या राजीव रामसोबत ऑस्ट्रेलियन जोडी थनासी कोकिनाकिस आणि निक किर्गोसचा ६-२, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. याचप्रमाणे भूपती आणि डॅनियन नेस्टर (कॅनडा) या पाचव्या मानांकित जोडीने पाबलो अँडुजर आणि गुलेर्मो गार्सिया-लोपेझ या स्पेनच्या जोडाला ६-२, ६-४ असे पराभूत केले.