एएफपी, लिव्हरपूल

नॅबी केईटा आणि रॉबेटरे फिरमिनो यांनी केलेल्या गोलांच्या बळावर लिव्हरपूलने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या सामन्यात पोटरेचा २-० असा धुव्वा उडवला. या विजयासह लिव्हरपूलने उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे.

पहिल्या अर्ध्या तासाच्या खेळावरच हुकूमत गाजवत लिव्हरपूलने या सामन्यावर वर्चस्व मिळवले होते. आता १७ एप्रिल रोजी इस्टाडियो डो ड्रॅगाओ येथे होणाऱ्या परतीच्या सामन्यात पोटरेला आगेकूच करण्यासाठी ४-० अशा फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

‘‘२-० हा आमच्यासाठी समाधानकारक निकाल आहे. संपूर्ण सामन्यावर लिव्हरपूलचे वर्चस्व पाहायला मिळाले. दोन शानदार गोल साकारल्यामुळे या विजयाचे श्रेय आम्हालाच जाते. परतीच्या सामन्यात पुनरागमन करण्यासाठी पोटरे संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, यात शंका नाही. मात्र आम्हीही त्यांना कडवी लढत देऊ,’’ असे लिव्हरपूलचे प्रशिक्षक जर्गेन क्लॉप यांनी सांगितले.

अन्य सामन्यांत, टॉटेनहॅमने मँचेस्टर सिटीचा १-० असा पराभव केला असला तरी हॅरी केनच्या दुखापतीमुळे त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरियाचा आघाडीवीर सन हेऊंग-मिनने ७८व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे टॉटेनहॅमने हा विजय मिळवला असला तरी आता मंगळवारी टॉटेनहॅम हॉट्सपर स्टेडियममध्ये रंगणाऱ्या परतीच्या सामन्यात त्यांची खरी कसोटी लागणार आहे. दुसऱ्या सत्रात फॅबियन डेल्फसोबत झालेल्या झटापटीत हॅरी केनच्या डाव्या पायाचा घोटा दुखावला गेला. त्यामुळे त्याला यंदाच्या मोसमाला मुकावे लागणार आहे.

‘‘आम्ही दर्जेदार खेळाचे प्रदर्शन केले. आता उपांत्य फेरीत मजल मारण्यासाठी तसेच मँचेस्टर सिटीच्या कडव्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. या सामन्यात विजय मिळवला तरी केनच्या दुखापतीमुळे आम्ही निराश झालो आहोत,’’ असे टॉटनहॅमचे प्रशिक्षक मॉरिसियो पोचेट्टिनो यांनी सांगितले.