गोलरक्षक श्रीजेशचे मत; चॅम्पियन्स चषक आणि सहा देशांच्या स्पध्रेसाठी भारतीय संघ सज्ज
इंग्लंडमध्ये होणारी चॅम्पियन्स चषक आणि स्पेनमधील सहा देशांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून रिओ ऑलिम्पिक स्पध्रेपूर्वी भारतीय संघातील खेळाडूंची मानसिक कणखरता चाचपडून पाहण्याची संधी मिळणार आहे, असे मत भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याने व्यक्त केले आहे. १० ते १७ जून या कालावधीत पार पडणाऱ्या चॅम्पियन्स चषक स्पध्रेसाठी भारतीय संघ रविवारी इंग्लंडला रवाना झाला. या स्पध्रेनंतर भारतीय संघ सहा देशांच्या आंतरराष्ट्रीय स्पध्रेसाठी व्हॅलेंसियाला रवाना होणार आहे.
‘लंडन आणि स्पेनमध्ये आम्ही सलग सामने खेळणार आहोत. अशाच प्रकारचे वेळापत्रक रिओ ऑलिम्पिक स्पध्रेतही आमच्या वाटय़ाला आले आहेत. हा काळ आमची मानसिक कणखरता तपासण्याचा आहे. जगातील चार अव्वल संघांविरुद्ध आम्ही लंडनमध्ये खेळणार आहोत आणि स्पेनमध्ये रिओत सहभागी झालेल्या पाच संघांचा सामना करणार आहोत. त्यामुळे सराव सामन्यात आखलेल्या रणनीतीची अंमलबजावणी करण्यात आम्ही कसे यशस्वी होतो, हे पाहणेही औत्सुक्याचे आहे,’ असे श्रीजेश म्हणाला.
रिओ ऑलिम्पिक स्पध्रेच्या दोन महिन्यांपूर्वी होणाऱ्या या स्पध्रेमुळे संघाला केवळ विश्रांतीसाठीच नव्हे, तर कमकुवत बाजूंवर अभ्यास करण्यासाठीही पुरेसा वेळ मिळणार आहे, असे श्रीजेशने सांगितले. तो म्हणाला, ‘लंडन ऑलिम्पिकपूर्वी जवळपास महिनाभर आम्ही युरोपात खेळलो आणि थेट ऑलिम्पिक स्पध्रेत दाखल झालो. यंदा काही वरिष्ठ खेळाडूंनी प्रशिक्षक रोअलँट ओल्टमन्स यांच्याशी न्यूझीलंड दौऱ्यानंतर चर्चा केली आणि यंदा वेगळा प्रयोग करण्याची विनंती केली. सलग सामने खेळून ऑलिम्पिकमध्ये दाखल होणे हे संघाची मानसिक दमछाक करणारे होते, परंतु यंदा आम्ही जुलैमध्ये मायदेशी परतणार आहोत आणि रिओपूर्वी आमच्याकडे बराच वेळ असेल.’