कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध आज भिडणार

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने पाचपैकी चार विजय मिळवून इंडियन प्रीमियर क्रिकेट लीगच्या १२व्या पर्वात शानदार सुरुवात केली आहे. मात्र मंगळवारी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात अग्रस्थानी असलेल्या कोलकातापेक्षा धडाकेबाज फलंदाज आंद्रे रसेलचीच भीतीत चेन्नईला जाणवत आहे.

कोलकाता आणि चेन्नई हे गुणतालिकेत वरच्या स्थानी असल्यामुळे या दोघांमध्ये कोण वरचढ ठरेल, याचीच उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागून राहिली आहे. दर्जेदार फिरकीपटू आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजाच्या मनात धडकी भरवणाऱ्या आंद्रे रसेलसारख्या फलंदाजाविरुद्ध खेळताना चेन्नईला आपले श्रेष्ठत्व सिद्ध करावे लागणार आहे.

दोन्ही संघ सध्या चांगली कामगिरी करत असून महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने शनिवारी किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवत आपली विजयाची गाडी पुन्हा रुळावर आणली. मात्र दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील कोलकाताची भीती त्यांना जास्त जाणवत आहे. कोलकाताने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करत रविवारी राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. दोन्ही संघांमध्ये अव्वल फिरकीपटूंचा समावेश असल्यामुळे एम.ए. चिदम्बरम स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात फलंदाजांची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे.

हरभजन सिंग, इम्रान ताहिर आणि रवींद्र जडेजा या चेन्नईच्या फिरकीपटूंनी गेल्या सामन्यात पंजाबची फलंदाजी पुरती पोखरली होती. त्याचबरोबर कुलदीप यादव, सुनील नरिन आणि पीयूष चावला हे कोलकाताचे फिरकी गोलंदाज आपली छाप पाडत आहेत. त्यांना जोस बटलरची साथ लाभत असल्यामुळे त्यांनी राजस्थानला २० षटकांत ३ बाद १३९ धावांवर रोखले होते. त्यामुळे दर्जेदार फिरकीपटूंमधील द्वंद्व पाहण्याची उत्सुकता क्रिकेटशौकिनांना लागून राहिली आहे.

कोलकाताच्या यशात आतापर्यंत आंद्रे रसेलने महत्त्वपूर्ण वाटा उचलला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धच्या सामन्यात कोलकाता संघ पराभवाच्या छायेत होता. पण रसेलने अखेरच्या क्षणी सात षटकारांची आतषबाजी करत कोलकाताला अनपेक्षित असा विजय मिळवून दिला होता. त्यामुळे चेन्नईसारख्या बलाढय़ संघाविरुद्ध रसेलकडून कोलकाताला पुन्हा अशाच दमदार कामगिरीची अपेक्षा असेल.

ड्वेन ब्राव्होला दुखापत झाल्यानंतर चेन्नईने त्याच्या जागी फॅफ डय़ू प्लेसिसला संधी दिली. डय़ू प्लेसिसनेही या संधीचे सोने करत ३८ चेंडूंत ५४ धावांची खेळी साकारली. मात्र अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करण्यात चेन्नईला अपयश येत आहे. या समस्येवर चेन्नईला लवकरच तोडगा काढावा लागणार आहे. मात्र घरच्या मैदानावर खेळताना चेन्नई पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखवून शकेल का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

* सामन्याची वेळ : रात्री ८ वाजता

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि सिलेक्ट १.

संघ

चेन्नई सुपर किंग्ज

महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फॅफ डय़ू प्लेसिस, मुरली विजय, केदार जाधव, सॅम बिलिंग्स, रवींद्र जडेजा, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्णोई, रितूराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, कर्ण शर्मा, इम्रान ताहिर, हरभजन सिंग, मिचेल सान्तनेर, शार्दूल ठाकूर, मोहित शर्मा, के. एम. आसिफ, दीपक चहर, एन. जगदीशन, स्कॉट कुगेलेइन.

कोलकाता नाइट रायडर्स

दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा, ख्रिस लिन, शुभमन गिल, आंद्रे रसेल, कालरेस ब्रेथवेट, सुनील नरिन, पीयूष चावला, कुलदीप यादव, नितीश राणा, निखिल नाईक, जो डेन्ली, श्रीकांत मुंढे, संदीप वॉरियर, प्रसिध कृष्णा, लॉकी फग्र्युसन, हॅरी गुरने, के. सी. करिआप्पा, यारा पृथ्वीराज.