सोची (रशिया) : जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला भारताचा युवा ग्रँडमास्टर विदित गुजराथीने सोमवारी अझरबैजानच्या वासिफ डुरारबायलीवर १.५-०.५ अशा फरकाने विजय मिळवत विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तब्बल १९ वर्षांनी प्रथमच एखाद्या भारतीय बुद्धिबळपटूने अशी कामगिरी केली आहे.

पाचव्या फेरीतील दुसऱ्या डावामध्ये विदितने पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना वासिफवर ३८ चालींमध्ये विजय मिळवला. या दोघांमधील पहिला गेम बरोबरीत सुटला होता. यापूर्वी २००० आणि २००२मध्ये विश्वनाथन आनंदने विश्वचषक जेतेपद मिळवले होते. आता पुढील फेरीत २६ वर्षीय विदितसमोर रशियाचा अलेक्झांडर ग्रिसचूक आणि पोलंडचा जॅन क्रेझीस्टोफ यांच्यातील विजेत्याचे आव्हान असेल.

दरम्यान, अन्य लढतीत नॉर्वेच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला रशियाच्या आंद्रे इस्पिनेकोने दुसऱ्या गेममध्ये बरोबरीत रोखल्यामुळे मंगळवारी टायब्रेकमध्ये त्यांच्यापैकी कोण उपांत्यपूर्व फेरी गाठणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

निहाल सरिनला दुसरे स्थान

बाएल (स्वित्झर्लंड) : भारताचा युवा ग्रँडमास्टर निहाल सरिन याने चार विजय आणि दोन डाव बरोबरीत सोडवत बाएल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवाच्या जलद प्रकारात दुसरे स्थान पटकावले. १७ वर्षीय सरिनने अमेरिकेच्या गाटा कामस्की याला बरोबरीत रोखत त्याची सलग पाच डावातील विजयी परंपरा खंडित केली. सरिनने सात फेऱ्यांमध्ये १४ पैकी १० गुण प्राप्त केले. त्याने किरिल अलेकसेंको, बोरिस गेलफंड, विन्सेंट केयमर, मॅक्सिम लॅगार्डे यांच्यावर विजय मिळवले.