X
X

China Open : सात्त्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत!

READ IN APP

चीनच्या तिसऱ्या मानांकित जोडीचा सरळ गेममध्ये केला पराभव

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पुरुष दुहेरीतील आघाडीची जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी विजयी घोडदौड कायम राखत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ४३ मिनिटे रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या ली जुन हुई आणि ल्यु यू चेन या जोडीचा भारतीय जोडीने पराभव केला. पहिला गेम भारतीय जोडीने २१-१९ असा जिंकला. दुसरा गेम जिंकण्यासाठी भारतीय जोडीला तुलनेने कमी परिश्रम घ्यावे लागले. दुसरा गेम २१-१५ असा जिंकत भारतीय जोडीने सामना खिशात घातला आणि चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरीत गाठली.

एकीकडे पुरुष व महिला एकेरीत भारताचे नामांकित खेळाडू निराशाजनक कामगिरी करत असताना सात्त्विक-चिराग यांनी मात्र भारताच्या आशा कायम ठेवल्या आहेत. थायलंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेते आणि फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धेचे उपविजेते पटकावणाऱ्या सात्त्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत जपानची सहावी मानांकित जोडी हिरोयुकी इंडो आणि युटा वाटांबे यांचा एक तास आणि सहा मिनिटे रंगलेल्या सामन्यात २१-१८, २१-२३, २१-११ असा पराभव केला होता.

जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या सात्त्विक-चिराग यांचा इंडो आणि वाटांबेविरुद्ध हा सलग दुसरा विजय ठरला होता. फ्रेंच स्पर्धेतही त्यांनी या जपानी जोडीविरुद्ध सरशी साधली होती. त्यानंतर शुक्रवारी रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीत सात्त्विक-चिराग यांनी ली जुन हुई आणि लि यू चेन यांचे आव्हान परतावून लावले. त्यामुळे सलग दुसऱ्या स्पर्धेत सात्त्विक-चिराग यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

20
X