प्रशांत केणी, लोकसत्ता

मुंबई : शार्दूल ठाकूरच्या खेळाकडे पाहून कपिल देवसारखा उत्तम अष्टपैलू खेळाडू घडवू शकलो, याचे समाधान वाटते, अशा शब्दांत प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याच्या कामगिरीची प्रशंसा केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटीमधील शार्दूलच्या अर्धशतकी खेळीचे विश्लेषण करताना लाड म्हणाले, ‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तेजतर्रार माऱ्यासमोर शार्दूलच्या फलंदाजीतील टेम्परामेंट दिसले. फलंदाजी करताना बिनधास्त फटके खेळण्याऐवजी गांभीर्याने चेंडूकडे पाहून फटके खेळ, हा सल्ला त्याच्यासाठी मोलाचा ठरला.’’

२००६ मध्ये शार्दूलने पालघरच्या तारापूर विद्यामंदिर शाळेकडून स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलविरुद्ध खेळताना ७८ धावा आणि पाच बळी घेण्याची किमया साधली. याच सामन्यामुळे लाड यांना हा हिरा गवसला. लाड म्हणाले, ‘‘शार्दूलच्या खेळाने मनावर छाप पाडली. त्याचा वेगवान मारा लक्षवेधी होता, तसेच फलंदाजी अप्रतिम करायचा. मग मी शार्दूलच्या पालकांपुढे माझ्या शाळेकडून खेळण्याचा प्रस्ताव ठेवला. मुंबईत आल्यास त्याचा खेळ विकसित होईल, हे पटवण्याचा प्रयत्न केला.

शार्दूल नववीतून दहावीला जाणार होता. त्यामुळे पालघर ते बोरिवली असा प्रवासातील बराच वेळ वाया घालवणे शार्दूलच्या पालकांना पटले नाही. मग लाड यांच्या घरीच शार्दूलच्या निवासाची सोय करण्यात आली आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.