भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिमॅच यांची कबुली

नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल संघाची गोल नोंदवणे ही सर्वात गंभीर समस्या आहे. यावर मात केल्यास भारतीय संघ सामनेजिंकू शकेल, अशी कबुली मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांनी दिली आहे.

२०२२च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता अभियानाला भारताने झोकात सुरुवात केली; परंतु नंतर कामगिरीत ते सातत्य राखता आले नाही. बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यासारख्या संघांनी बरोबरीत रोखल्याने भारताच्या पात्रतेच्या आशा मावळल्या आहेत.

‘‘सध्या तरी गोल नोंदवणे ही आमची महत्त्वाची समस्या आहे. आम्ही उत्तम खेळाचे प्रदर्शन केले आहे; परंतु या प्रयत्नांना गोलसाध्यतेचे यश लाभले नाही. यावरच उपाय शोधण्याची आवश्यकता आहे,’’ असे ५२ वर्षीय स्टिमॅच यांनी सांगितले.