भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून माझे कार्य फक्त कर्णधार कोहलीला व्यूहरचना आखण्यात सहकार्य करणे आहे, असे मत अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने व्यक्त केले.

रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत २-१ अशी धूळ चारली. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठीसुद्धा रहाणेकडेच कर्णधारपद सोपवण्यात यावे, अशी मागणी काही चाहत्यांनी केली. परंतु रहाणेने अशा प्रकारच्या चर्चाकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले आहे.

‘‘एखाद्या मालिकेत तुम्ही कर्णधार म्हणून यशस्वी ठरलात, तर लगेच नियमित कर्णधाराची हकालपट्टी करून तुम्हाला नेतृत्व मिळणे, हा विचार खरेच हास्यास्पद आहे. मुळात कोहली आणि माझ्या नेतृत्वाची तुलना करणेच चुकीचे आहे. संघाचा उपकर्णधार या नात्याने मी फक्त त्याला प्रत्येक निर्णयात सहकार्य करण्याचे कार्य करतो. त्याशिवाय सामन्याच्या परिस्थितीनुसार गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणात कोणते बदल करावे, याविषयी आम्ही सातत्याने चर्चा करत असतो,’’ असे रहाणे म्हणाला.

अ‍ॅशेसपेक्षा भारताला नमवणे अधिक आव्हानात्मक – प्रायर

चेन्नई : अ‍ॅशेस कसोटी मालिकेला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते, पण भारताला त्यांच्याच भूमीत नमवणे त्यापेक्षाही आव्हानात्मक आहे, असे स्पष्ट मत इंग्लंडचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज मॅट प्रायरने व्यक्त केले. ‘‘कसोटी क्रिकेटचा विचार केल्यास सगळेच जण अ‍ॅशेस मालिकेला वरच्या क्रमांकावर लेखतात, परंतु माझ्या मते भारताला भारतात पराभूत करणेही तितकेच, किंबहुना त्याहूनही अधिक आव्हानात्मक आहे. त्यामुळे आगामी कसोटी मालिका इंग्लंडच्या दृष्टीने फार मोलाची असेल,’’ असे ३८ वर्षीय प्रायर म्हणाला. २०१२ मध्ये इंग्लंडनेच भारताला कसोटी मालिकेत २-१ अशी धूळ चारली होती. त्या वेळी प्रायर इंग्लंड संघाचा सदस्य होता.

फिरकीपटूंविरुद्ध खेळपट्टीवर टिकणे महत्त्वाचे -ट्रॉट

भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत इंग्लंडला यशस्वी व्हायचे असल्यास त्यांच्या फिरकीपटूंविरुद्ध अधिकाधिक काळ खेळपट्टीवर तग धरणे महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचे फलंदाजी सल्लागार जोनाथन ट्रॉट यांनी व्यक्त केली. ‘‘चेन्नईची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी नंदनवन मानली जाते. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांचे फिरकीपटूंविरुद्धचे तंत्र अधिक विकसित करण्यावर मी भर देत आहे. चौथ्या-पाचव्या दिवशी दडपणाखाली फिरकीपटूंविरुद्ध इंग्लंडने सक्षमरीत्या फलंदाजी केली, तर त्यांना नक्कीच यश मिळेल,’’ असे ट्रॉट म्हणाले.

आणखी खेळण्याचे लक्ष्य – रूट

इंग्लंडचा कर्णधार जो रूट शुक्रवारपासून कारकीर्दीतील १००वी कसोटी खेळणार असून शरीर साथ देईपर्यंत आणखी ५० कसोटींमध्ये खेळायला आवडेल, असे त्याने सांगितले. ‘‘इंग्लंडच्या कसोटी संघाचे प्रतिनिधित्व करणे, हेच माझे स्वप्न होते. माझ्यात अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक असून किमान १५० कसोटी सामन्यांत खेळण्यासाठी मी उत्सुक आहे,’’ असे रूट म्हणाला.

बेस-लीच यांच्यावर इंग्लंडची धुरा

इंग्लंडनेही दोन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजांना संघात स्थान देण्याचे धोरण आखले आहे. जेम्स अँडरसन आणि जोफ्रा आर्चर वेगवान माऱ्याचे प्रतिनिधित्व करतील, तर ऑफ-स्पिनर डॉम बेस आणि डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीच हे दोघे फिरकीची धुरा वाहतील.