IND vs AUS 4th Test: ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन कसोटीत भारतीय क्रिकेट संघात दोन खेळाडूंना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज टी नटराजन यांनी या कसोटीतून क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शुभमन गिल आणि मोहम्मद सिराजने मेलबर्न कसोटीतून पदार्पण केले होते. त्यानंतर आज सुंदर आणि नटराजनला संधी मिळाली. नटराजनने एकाच दौऱ्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण करत इतिहास रचला. पण वॉशिंग्टन सुंदरच्या पदार्पणाची जास्त चर्चा रंगली.

आणखी वाचा- IND vs AUS: नटराजनची पहिल्याच कसोटीत भुवनेश्वर कुमारच्या विक्रमाशी बरोबरी

भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलेल्या स्टीव्ह स्मिथने गेल्या सामन्यात भरपूर धावा केल्या. एक शतक आणि एक अर्धशतक ठोकत त्याने गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. चौथ्या कसोटीतदेखील स्मिथने आपली लय कायम राखत खेळ सुरू केला. ७७ चेंडू खेळून तो खेळपट्टीवर स्थिरावला होता. अशा वेळी सुंदरने त्याचा काटा काढला. सुंदरने पदार्पणाच्या कसोटीत पहिला गडी मिळेपर्यंत एकही धाव दिली नाही. गोलंदाजी मिळाल्यापासून त्याने स्मिथ आणि लाबूशेन जोडीला एकही धाव काढून दिली नाही. त्याने पहिली तीनही षटकं निर्धाव टाकली. धावा मिळत नाहीत हे पाहून स्मिथने सुंदरवर हल्ला चढवण्याचा विचार केला खरा पण सुंदरच्या चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याला झेलबाद व्हावे लागले.

आणखी वाचा- IND vs AUS: नटराजनने मैदानात उतरताच रचला इतिहास; ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच भारतीय

स्मिथ धावा काढण्यासाठी फटका खेळणार हे माहिती असल्याने अजिंक्य रहाणेने रोहित शर्माला योग्य ठिकाणी फिल्डिंगसाठी उभं केलं आणि सुंदरने ठरल्याप्रमाणे चेंडू टाकला. चेंडू रोहितच्या दिशेने आला आणि त्याने कोणतीही चूक न करता झेल टिपला. त्यामुळे स्मिथला ५ चौकारांसह ३६ धावांवर माघारी परतावं लागलं.