ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य व एक कांस्यपदक मिळवणारा भारताचा कुस्तीपटू सुशील कुमार हा तिसऱ्या ऑलिम्पिक पदकासाठी इच्छुक असून त्यापूर्वी त्याची आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कसोटी ठरणार आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवणाऱ्या सुशीलने यंदाही विजेतेपदाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवत सराव केला आहे. तो म्हणाला, ‘‘भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या हेतूनेच मी कुस्तीत कारकीर्द घडवण्यास सुरुवात केली. त्यामुळेच प्रत्येक स्पर्धेत शंभर टक्के कामगिरी करण्यावर माझा भर असतो. ऑलिम्पिक पदक पटकावण्याची माझ्याकडे अजूनही क्षमता आहे.’’

रिओ येथे २०१६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान सुशील व नरसिंग यादव यांच्यातील मतभेदांमुळे खूप वादंग निर्माण झाले होते. नरसिंगला रिओला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, मात्र उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे त्याला स्पर्धेबाहेर जावे लागले, तसेच त्याच्यावर बंदीची कारवाई झाली. आगामी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली त्या वेळीही सुशील व त्याचा प्रतिस्पर्धी परवीन राणा यांच्यात झालेल्या मारामारीमुळे या चाचणीस गालबोट लागले होते. सुशीलने सांगितले, ‘‘मी दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवले आहे. यावरूनच माझी योग्यता सिद्ध होते. देशाला सुवर्णपदक जिंकून देण्याचेच ऋण माझ्यावर आहे व ते फेडण्यासाठी २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये मी प्रयत्न करणार आहे.’’