कोरे अँडरसनने दोन चौकार आणि दहा उत्तुंग षटकारांसह ४१ चेंडूंत ९४ धावांची झंझावाती खेळी साकारली. या बळावर न्यूझीलंडने बांगलादेशवर तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात २७ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत ३-० असे निभ्रेळ यश मिळवले.

अँडरसनने केन विल्यमसन (६०) सोबत चौथ्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने ४ बाद १९४ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशने २० षटकांत ६ बाद १६७ धावा केल्या.

तमिम इक्बाल आणि सौम्या सरकार यांनी ४.४ षटकांत ४४ धावांची सलामी दिली. तमिम २४ धावांवर बाद झाल्यावरही बांगलादेशने १० षटकांत २ बाद ८९ धावांपर्यंत धावफलक रेटला. मात्र सौम्या (४२) बाद झाल्यावर त्यांची धावगती खालावली. शकिब अल हसनने ४१ धावा केल्या. ईश सोधी आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड : २० षटकांत ४ बाद १९४ (कोरे अँडरसन नाबाद ९४, केन विल्यमसन ६०; रुबेल हुसेन ३/३१) विजयी वि. बांगलादेश : २० षटकांत ६ बाद १६७ (सौम्या सरकार ४२, शकिब अल हसन ४१; ईश सोधी २/२२, ट्रेंट बोल्ट २/४८).

सामनावीर : कोरे अँडरसन.