करोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभरात तणावाचं वातावरण आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारने मुंबईसह नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड यासारखी महत्वाची शहरं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवांना या लॉक-डाऊनमधून वगळण्यात आलं आहे. क्रीडा क्षेत्रालाही करोनाचा फटका बसला आहे. भारतात बीसीसीआयने अनेक महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत.

कर्णधार विराट कोहलीसह अनेक महत्वाच्या क्रीडापटूंनी चाहत्यांना या काळात घरी राहून स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. अनेक क्रिकेटपटू सध्या आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. करोनाच्या प्रादुर्भावापासून क्वारंटाईन केल्यानंतर स्वतःचा वेळ घालवण्यासाठी मुंबईकर श्रेयस अय्यरने एक अनोखा उपाय शोधलाय. तो सध्या जादूचे प्रयोग करतोय, श्रेयसने आपल्या बहिणीसोबत एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केलाय…पाहा हा व्हिडीओ

२९ मार्चपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार होती. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव पाहता ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. १५ एप्रिलपर्यंत परिस्थितीवर नियंत्रण न आल्यास बीसीसीआय आयपीएलसाठी इतर पर्यायांचाही विचार करत आहे.