देशभरात पसरलेल्या करोना विषाणूशी लढण्यासाठी केंद्र आणि संबंधित राज्य सरकारच्या यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र या रोगावर अद्याप औषध सापडलं नसल्यामुळे जगभरातील देशांमधील वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरु आहेत. सध्याच्या काळात करोना बाधित रुग्णांची काळजी घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. तरीही समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोकं आपलं कर्तव्य ओळखून सरकारी यंत्रणांना आर्थिक मदत करत आहेत. भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानेही करोनाविरोधातील लढ्यात आपलं योगदान दिलं.

सुरेश रैनाने पंतप्रधान सहायता निधी (PM Cares Fund) मध्ये ३१ लाख तर उत्तर प्रदेश सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीला २१ लाखांची रक्कम दिली. करोनाविरोधातील लढ्यात आपण सर्वांनी आपल्याला जमेल तितकी रक्कम दान करावी असं रैनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सुरेश रैनाच्या हा सहकार्याबाबत त्याचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने आभार मानले. रैना उत्तम फलंदाज आहे. त्यामुळे मोदींनी त्याला आवडेल अशा प्रकारे रिप्लाय देत त्याचे आभार मानले. रैनाने केलेल्या ५२ लाखांच्या मदतीवर “हे एक उत्तमरित्या झळकावलेलं अर्धशतक आहे”, असे मोदी यांनी ट्विट केले.

सुरेश रैना नुकताच एका मुलाचा बाप झाला आहे. काही दिवसांपूर्वी रैनाच्या पत्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. दरम्यान, अनेक भारतीय खेळाडू करोनाविरोधातील लढ्यात आपली भूमिका बजावत आहेत. आतापर्यंत रोहित शर्मा, नेमबाज इशा सिंग, पी.व्ही.सिंधू, गौतम गंभीर, बजरंग पुनिया, इरफान-युसूफ पठाण, महेंद्रसिंह धोनी, सानिया मिर्झा, सचिन तेंडुलकर, हिमा दास इत्यादी खेळाडूंनी करोनाविरुद्ध लढ्यात मदत केली आहे. याव्यतिरीक्त मुंबई क्रिकेट संघटनेनेही मुख्यमंत्री सहायता निधीला ५० लाखांची मदत केली आहे. तर BCCI ने ५१ कोटींचे सहाय्य केले आहे. तसेच, परिस्थिती बिघडल्यास आपल्या अखत्यारीत येणारी मैदानं वैद्यकीय सुविधेसाठी खुली करण्याची तयारी MCA ने दाखवली आहे.