सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट हे एक अतूट नाते आहे. खऱ्या अर्थाने ‘चॅम्पियन’ कसा असला पाहिजे, याचे तो मूर्तिमंत उदाहरण आहे. खेळावर निष्ठा बाळगणारा आणि परिस्थितीचे भान ठेवून जबाबदारीने खेळणारा त्याच्याइतका अजिंक्य योद्धा सध्या तरी आपल्या संघाकडे नाही. त्याला पर्याय निर्माण झाले असले तरी या खेळाडूंच्या खूप काही मर्यादा आहेत. त्यामुळेच तो आणखी तीन-चार वर्षे सहज अव्वल दर्जाचे क्रिकेट खेळू शकेल. क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय कारकीर्द त्याने सुरू केली, त्यावेळी त्याला मिसरूडही फुटले नव्हते. परंतु या कोवळ्या वयातही त्याने अतिशय धैर्याने संघ व्यवस्थापनाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी ओळखूनच दिमाखदार कामगिरी केली आणि आता चाळिशीच्या टप्प्यावर असतानाही तो अजूनही अशी जबाबदारी समर्थपणे आपल्या खांद्यावर घेताना दिसतो. गेल्या २४-२५ वर्षांच्या या कारकिर्दीत त्याच्यापुढे अनेक वेळा अनेक अडचणी निर्माण झाल्या, पण या समस्यांकडे दुर्लक्ष करीत त्याने खेळाशी असलेले प्रामाणिक नाते कधीही तोडले नाही. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीबाबत तो अतिशय आदर्श खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये ४५-४८ वर्षांपर्यंत कारकीर्द यशस्वी करणारे अनेक खेळाडू यापूर्वीही झाले आहेत. त्यामुळेच सचिन आणखी तीन-चार वर्षे सहज आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकेल. सर्वोत्तम यशस्वी खेळाडू होण्यासाठी कठोर मेहनतीची आवश्यकता असते. सचिन याने पहिल्यापासूनच मेहनत घेतली आहे आणि पूर्वीइतकीच मेहनत तो अजूनही करतो हे त्याच्या क्षेत्ररक्षणातील चापल्यतेद्वारे निश्चित लक्षात येते. युवा खेळाडूलाही आश्चर्य वाटेल इतके चापल्य तो सीमारेषेजवळ क्षेत्रक्षण करताना दाखवीत असतो. सहकाऱ्याला प्रोत्साहन देताना तो आपणही अद्याप शंभर टक्के तंदुरुस्त आहोत हे त्याच्या खेळातील शैलीतून अनेक वेळा सिद्ध झाले आहे. खेळाडूच्या जीवनात यश-अपयश असे चढउतार असतात. सचिनबाबतही असे दिसून आले आहे. सचिनचा ‘फॉर्म’ संपला, अन्य खेळाडूंप्रमाणेच त्यानेही क्रिकेटमधून निवृत्त व्हावे व अन्य नवोदित खेळाडूंना संधी द्यावी अशा अनेक टीका झाल्या आणि अजूनही होत आहेतच. त्याची जागा घेणारे खेळाडू आहेत, त्यांना संधीही भरपूर मिळाल्या. मात्र त्याची जागा अद्याप कोणीही घेऊ शकलेले नाही, हे निर्विवाद सत्य आहे. झटपट क्रिकेटमध्ये सातत्याने चमक दाखविणारे अनेक खेळाडू आहेत. मात्र सचिनच्या जागेवर खेळताना भारतीय संघाकडून खेळताना त्यांच्यात सातत्य दिसत नाही. सचिनइतकी खेळावरची निष्ठा व जबाबदारीचे भान त्यांच्याकडे दिसत नाही. त्यामुळेच निवड समितीही सचिनला संघातून वगळण्याचे धाडस दाखवीत नव्हती. लागोपाठचे सामने व स्पर्धा यामुळे होणारी दमछाक लक्षात घेऊन त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्धविराम घेतला आहे. झटपट क्रिकेटऐवजी तो फक्त कसोटी क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करणार आहे. पाच दिवसांच्या कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविण्यासाठी आवश्यकता असते ती कमालीच्या शारीरिक क्षमतेची. ही शैली सचिनकडे अजूनही आहे. अजिंक्यवीराकडे असलेले सर्व गुण सचिनकडे दिसून येतात. त्याच्या कारकिर्दीत अनेक वेळा त्याला दु:खद प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. मनोधैर्यावर अनिष्ट परिणाम करणाऱ्या अनेक समस्या त्याच्या मार्गात आल्या. संयम, चिकाटी, दृढनिष्ठा, सहकाऱ्यांना सामावून घेण्याची आणि सहकार्य करण्याची शैली यामुळेच सचिन हा एकमेवाद्वितीय ‘चॅम्पियन’ आहे. हे गुण त्याने अजूनही दाखविले तर त्याची क्रिकेट कारकीर्द दिमाखात सुरू राहील, यात तिळमात्र शंका नाही. तो एवढा उच्च दर्जाचा क्रिकेटपटू आहे की, त्याच्यावर झालेले टीकेचे घाव त्याला कधीही बोचणार नाहीत. तो जेव्हा मैदानावर उतरतो, तेव्हा त्याचे लक्ष्य असते आपल्या संघास यशस्वी करण्याचे. ज्याप्रमाणे महाभारतातील अर्जुनाला फक्त पक्ष्याचा डोळाच दिसत होता, तद्वत सचिनलाही फक्त संघनिष्ठाच दिसत असते. घरी काय घडले, आजूबाजूला काय चालले आहे, कोण काय म्हणते या सर्व गोष्टी तो मैदानावर प्रवेश करताना विसरून जातो आणि त्याला फक्त दिसत असते ती सर्वोत्तम कामगिरी. वयोमानानुसार फलंदाजीतील समयसूचकतेबाबत तो कमी पडत असला तरी त्यामध्ये सुधारणा कशी करायची हे त्यालाच माहीत आहे. त्याचा खेळ अजूनही असंख्य चाहत्यांना हवाहवासा वाटतो. हीच त्याच्या लोकप्रियतेची पावती आहे व हेच त्याच्या यशस्वी कारकिर्दीचे गमक आहे.
(शब्दांकन- मिलिंद ढमढेरे)